जळगाव : विनापावती रेशनच्या धान्याने भरलेले वाहन आज आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या सतर्कतेने पकडण्यात आले. शासकीय गोडाऊनमधून धान्याने भरलेले वाहन आज सकाळी थेट तांबापुरा – बिलाल चौकातील एका रेशन दुकानावर आले होते. त्या वाहनातील धान्याचे पोते दुस-या वाहनात भरुन ते वाहन निघून गेले होते. या संशयास्पद प्रकाराची माहिती गुप्ता यांना समजताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. हा संशयास्पद प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी तहसीलदार नामदेव पाटील यांचेशी संपर्क साधला.
या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी तहसीलदार नामदेव पाटील यांनी पुरवठा तपासणी अधिकारी दिगंबर जाधव यांना घटनास्थळावर रवाना केले. प्रकरण अंगाशी येत असल्याचे बघून संधी साधत धान्याने भरलेल्या वाहनाचा चालक पसार होण्यात यशस्वी झाला होता. दरम्यान घटनास्थळावर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे व इतर कर्मचारी दाखल झाले होते.
पुरवठा तपासणी अधिकारी दिंगबर जाधव आणि त्यांचे सहकारी पंडीत पाटील असे आल्यावर त्यांनी चौकशीला सुरुवात केली. तेथे हजर असलेल्या शेख अन्वर उर्फ बबलू शेख (पाळधी – धरणगाव) याने या मालावर आपला हक्क सांगीतला. शेख अहमद शेख निसार (पाळधी ता. धरणगाव जि. जळगाव) यांचे नावे असलेले पाळधी येथील शासकिय धान्य दुकान आपण चालवत असल्याचे त्याने कथन केले.
50 किलो वजनाचे 131 गव्हाचे पोते आणी 50 किलो वजनाचे 141 तांदुळाचे पोते असलेल्या मालाची त्याला बिल पावती मागण्यात आली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. हा सर्व संशयास्पद प्रकार असल्यामुळे पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. धान्याने भरलेले आयशर वाहन एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणून जमा करण्यात आले. शेख अन्वर उर्फ बबलु शेख गफार रा, पाळधी ता. धरणगाव जि. जळगाव (स्वस्त धान्य दुकान चालक) व वार्ड क्र. 38/1 स्वस्त धान्य दुकान नं. 68 तांबापुरा जळगाव या दुकानाचे मालक शेख अहमद शेख निसार रा. पाळधी ता, धरणगाव या दोघांविरुद्ध जिवनावश्क वस्तु कायदा 1955 चे कलम 3,7 व प्रचलित कायद्यानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.