जळगाव : जीनगर मारवाडी समाजाचे राष्ट्रभक्त स्वातंत्र्य सेनानी अमर शहीद बिरबलसिंग ढालिया यांचा 75 वा शाहिद दिवस त्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आला. अमर शहीद बिरबल ढालिया यांनी 30 जून 1946 रोजी राजस्थानच्या गंगा नगर जिल्ह्यातील रायसिंग नगर येथे भारत छोडो अभियानात सहभाग घेतला होता. त्या काळात तिरंगा फडकवण्यास प्रतिबंध होता. त्यावेळी त्यांनी तिरंगा हाती घेत इन्कलाब जिंदाबाद चा नारा देत मोर्चा काढला होता.
त्या वेळी इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. तीन गोळ्या अंगावर झेलल्यानंतर देखील त्यांनी हातातील तिरंगा सोडला नव्हता. त्यांची प्राणज्योत मालवल्यानंतर देखील तिरंगा त्यांच्या हातातच होता. अमर शहीद बिरबल सिंग ढालिया यांच्या प्रतिमेचे पूजन 30 जून रोजी समाजाचे अध्यक्ष डॉ. विजय साखला, उपाध्यक्ष गोकुळ चव्हाण, सचिव सुनिल पवार, रतन साखला, योगेश सोनग्रा, सुयोग परिहार, पारस साखला, गट शिक्षण अधिकारी विजय पवार, कल्पक साखला, नीरज साखला, यांच्यासह सर्व समाज बांधवांनी त्यांचा शहीद दिवस साजरा केला.