खडसेंचे जावई आता 19 जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत

मुंबई : माजी विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी सध्या पुणे – भोसरी येथील जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी इडीच्या ताब्यात आहेत. ईडीने त्यांना 6 जुलै 2021 रोजी उशिरा रात्री अटक केली होती. ईडी न्यायालयाने अगोदर त्यांना 12 जुलै पर्यंत व आता पुन्हा 19 जुलै पर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

एकनाथराव खडसे यांच्यावर भूखंड खरेदी प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीकडून 30 जून 2017 रोजी गोपनीय अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. या अहवालाचा आधार घेत तत्कालीन फडणवीस सरकारची कोंडी करणारे आघाडी सरकार आता अडचणीत सापडले आहे. आता एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची ईडीची कोठडी 19 जुलै पावेतो वाढली आहे. या सर्व पार्श्वभुमीवर एकनाथराव खडसे यांच्या अडचणी देखील वाढल्या असल्याचे म्हटले जात आहे.

एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे क्र. 52/2 अ ही जागा अब्बास रसूलभाई उकानी या जमीन मालकाकडून अवघी 3.75 कोटी रुपयात खरेदी केली. या व्यवहारात 31 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान व बनावट कंपन्यांच्याद्वारे पैसे वळते केल्याचा ईडीला संशय आहे. महसूलमंत्रीपदावर त्यावेळी असलेले एकनाथराव खडसे हे सर्व शासकीय जमिनीचे संरक्षक होते. पत्नी व जावयाच्या नावावर त्यांनी जागा खरेदी करुन नियमांचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले जात आहे. खडसे यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here