विश्वासावर दिलेल्या ट्रकचे खरेदीदार झाले दोघे —विक्रेत्यासह पोलिस कस्टडीत आले आरोपी तिघे

जळगाव : लबाडीच्या इराद्याने गोड बोलून नेलेली ट्रक मुळ मालकास वेळेवर परत देण्याऐवजी ती परस्पर एकाला विकण्याचा प्रकार एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यातील निलेश परदेशी याने केल्याचे उघड झाले आहे. विकत घेणा-याने ती ट्रक अजून दुस-याला विकण्याचा वरचढ प्रकार देखील उघडकीस आला आहे. धुण्यावर धुणे आपटून आपले उखळ पांढरे करुन घेण्याचा हा प्रकार पोलिसांच्या ताब्यातील तिघांनी केल्याचे म्हटले जात आहे.

कैलास सोनू चव्हाण (देव्हारी – धानवड ता. जिल्हा जळगाव) या ट्रकचालकाकडून निलेश राजेंद्र परदेशी (मामलदा – चोपडा) याने काही कालावधीसाठी गोड बोलून ट्रक नेली होती. ती ट्रक त्याने परस्पर दिपक अरुण पाटील (अकुलखेडा – चोपडा जि. जळगाव) यास विक्री केली. दिपक पाटील याने ती ट्रक मुकेश शांताराम चौधरी (रा. धरणगाव) यास विकून माथी मारल्याचा प्रकार पोलिस तपासात उघड झाला आहे. या घटनेत सुरुवातीला ताब्यात घेतलेला आरोपी निलेश याची पोलिस कोठडी आज संपली होती. त्याच्यासह इतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता तिघांना सोमवार पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

कैलास सोनू चव्हाण (देव्हारी – धानवड ता.जि. जळगाव) हा ट्रक चालक असून त्याने निलेश परदेशी याचेकडून विस हजार रुपये उधार घेतले होते. गेल्यावर्षी लॉकडाऊन कालावधीत निलेश परदेशी हा कैलासकडे त्याचे विस हजार रुपये परत मागण्यासाठी आला होता. मात्र लॉकडाऊन सुरु असल्यामुळे नंतर देतो असे कैलासने निलेश यास म्हटले होते. निलेशने कैलासला त्याची मालवाहू ट्रक चालवण्यास मागीतली होती. ट्रक चालवून आलेल्या भाड्यातून विस हजाराची कमाई झाल्यानंतर दोन महिन्यात ट्रक परत करण्याच्या बोलीवर निलेश ट्रक घेऊन गेला होता. विस हजार रुपये परस्पर फिटतील या आशेने व विश्वासाने कैलासने निलेश यास लाखो रुपयांची त्याची मालवाहू ट्रक त्याच्या ताब्यात दिली. त्यानंतर एक महिन्याचा कालावधी लोटला. कैलासने निलेशच्या मोबाईलवर ट्रक परत घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र निलेशचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. त्यामुळे कैलासने निलेशचे तो रहात असलेले चोपडा तालुक्यातील मामलदा गाव गाठले. तेथे तो आणि ट्रक दोघेही नव्हते. नातलगांच्या मदतीने कैलासने ट्रकचा शोध सुरुच ठेवला.

दरम्यान 7 जुलै रोजी सदर ट्रक माल घेऊन नागपूर येथे गेला असल्याची माहिती कैलासला मिळाली. तेथे कैलासने निलेश यास गाठले. तेथे निलेश यास ट्रकची विचारणा केली असता तो म्हणाला की ट्रक जळगावला आहे. त्यामुळे कैलास व त्याचे सोबती पुन्हा जळगावला परत आले. मात्र ट्रक जळगावला नव्हती. त्यामुळे पुन्हा निलेश यास विचारणा करण्यात आली. त्यावेळी ट्रक चोपडा येथे असल्याचे निलेशने सांगितले. पुन्हा सर्व जण चोपडा येथे गेले. मात्र ट्रक चोपडा येथे देखील नव्हती. निलेश आपली फसवणूक करत असल्याचे कैलासच्या लक्षात आले. आपली ट्रक निलेशने कुठेतरी लपवून ठेवली असल्याचे कैलासच्या लक्षात आले. या प्रकरणी कैलास चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार 13 जुलै रोजी एमआयडिसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि.प्रताप शिकारे यांच्या निर्देशाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सैय्यद , सचिन पाटील यांनी निलेश परदेशी याला अटक केली होती. अटक व पोलिस कोठडी दरम्यान त्याने ती ट्रक दिपक अरुण पाटील याला परस्पर विकल्याचे कबुल केले. त्यामुळे पोलिस पथकाने दिपक अरुण पाटील यास तो रहात असलेल्या गावातून ताब्यात घेत अटक केली. त्याला विचारपूस केली असता त्याने ती ट्रक परस्पर मुकेश शांताराम चौधरी याला विक्री केल्याचे कबुल केले.

तिघांना न्या. ए.एस. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश दिले. सरकारतर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, योगेश बारी व सचिन पाटील यांनी तपासात सहभाग घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here