जळगाव : दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सभेत जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोकभाऊ भवरलालजी जैन यांची महासंघाच्या सल्लागार समितीत नियुक्ती करण्यात झाली आहे.
बुद्धिबळाच्या विकासासाठी खेळाडूंच्या कौशल्य आणि क्षमता विकसित करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करणे, योग्य प्रशिक्षण, सुविधा आणि मार्गदर्शन तसेच बुद्धिबळ खेळातील होतकरु खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे महत्वपुर्ण कार्य अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या वतीने करण्यात येत असते. क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तसेच स्वच्छ प्रतिमा, संघटन कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या अशोकभाऊ जैन यांच्या कार्याची दखल महासंघाने घेतली आहे.
तसेच बुद्धिबळाच्या सर्वांगीण विकासासाठी महासंघाच्या सल्लागार समितीत त्यांची नियुक्ती करण्यात आली आह. राष्ट्रीय स्तरावरील अशोकभाऊ जैन यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र चेस असोसिएशनचे पदाधिकारी, बुद्धिबळ खेळाडू तसेच क्रीडा प्रेमींमधे आनंदाचे वातावरण पसरले आहे. या सभेस अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय कपूर, सचिव भरतसिंग चौहान, महासंघाचे मुख्य प्रशिक्षक व चेअरमन अभिजीत कुंटे, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ मयुर. सचिव निरंजन गोडबोले यांच्यासह विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.