औरंगाबाद (वाळूज) : पतीच्या निधननंतर मुलांसह रांजणगाव येथे वास्तव्य आणि एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या विधवेस सहकारी कामगाराने लग्नाचे आमिष दाखवले. या आमिषानंतर त्याने गोड बोलून तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर संधी साधून तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय दिल्लीला जाऊन यूपीएससीचे क्लास करण्यासाठी त्याने सदर विधवा महिलेकडून तीन लाख रुपये देखील घेतले होते.
या प्रकरणी पीडित विधवा महिलेने वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले. 21 जुलै रोजी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला. श्रीकांत विक्रम इंगोले (27) रा. सावरगाव बंगला हिंगोली असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पिडितेच्या पतीचे सन 2013 मध्ये निधन झाल्यानंतर ती आपल्या मुलांसोबत रांजणगाव येथे राहते. सन 2015 पासून ती एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. दरम्यानच्या कालावधीत श्रीकांतसोबत तिची ओळख झाली. तिच्याकडेच श्रीकांतने मेस लावली. त्यामुळे दोघात अजून जवळीक निर्माण झाली. श्रीकांत आजारी पडल्यानंतर महिलेनेच त्याला वैद्यकीय सेवा देत मदत केली. मी तुझ्यासोबतच लग्न करणार असल्याचे म्हणत त्याने तिच्यासोबत शरीर संबंध निर्माण केले.
काही दिवसांनी गोड बोलून त्याने दिल्ली येथे युपीएससीचा क्लास लावण्याच्या निमीत्ताने तिच्याकडून तिन लाख रुपये घेतले. तिन लाख रुपये घेतल्यानंतर त्याने दिल्ली गाठली. दिल्ली येथे गेल्यावर त्याने लवकरच तिच्यासोबत संपर्क कमी केला. आपल्याला आई, भाऊ व बहिण नसल्याचे त्याने खोटे कथन केल्याचे पिडीतेला समजले. त्यानंतर तो औरंगाबाद येथे आला. औरंगाबादला आल्यानंतर तो नात्यातील एका मुलीसोबत लग्न करणार असल्याचे पिडीतेला समजले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर तिने त्याच्याविरुद्ध बलात्कारासह फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो.नि. मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.