शेलपिंपळगाव : खेडचे आमदार दिलीप मोहिते – पाटील यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. या फेसबुक खात्याच्या माध्यामातून पैशांची मागणी केली जात असल्याचा देखील प्रकार उघड झाला आहे.

कुणीतरी केलेला हा खोडसाळपणा कार्यकर्त्यांनी आ. मोहिते पाटील यांच्या लक्षात आणून दिला. हा प्रकार लक्षात येताच आ. मोहिते पाटील यांनी कायदेशीर रितसर तक्रार दाखल केली आहे. या बनावट फेसबुकच्या अकाऊंटवरुन अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली असल्याचे दिसून आले. या अकाऊंटवर इंग्रजीत मोहिते पाटील यांचे नाव लिहिले असून फोटो देखील वापरला आहे.
हा फोटो व नाव बघून अनेकांनी ती रिक्वेस्ट स्विकारली. या खात्यावरुन अनेकांना पन्नास हजार रुपयांची मागणी देखील करण्यात आली. आमदार मोहिते यांनी कायदेशीर तक्रार दाखल करत अशा खोटेपणाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.






