औरंगाबाद : कडेकोट सुरक्षा असतांना देखील हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील दोघा कुख्यात गुन्हेगारांकडे मोबाईल आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कारागृहाच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत अक्षय शामराव आठवले व विजय शामराव गोयर या दोघा कैद्यांजवळ मोबाइल सापडले आहेत. या प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून खळबळ माजली आहे.
हर्सूल मध्यवर्ती कारागृहात कच्च्या कैद्यांसह राज्यभरातील विविध गंभीर गुन्ह्यांतील आरोपी कैदेत आहेत. शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे या कारागृहात कडक सुरक्षा असते. मात्र 23 जुलैच्या सायंकाळी कारागृह अधिकाऱ्यांना काही कैद्यांच्या ताब्यात मोबाईल असल्याची माहिती मिळाली. तुरुंग अधिकारी अमित गुरव यांच्यासमवेत असलेल्या पथकाने कैद्यांची झडती घेतली. या झडतीत अक्षय आठवले याची अंगझडती घेण्यात आली. त्याच्याकडे एक चायना मेड साधा मोबाइल सापडला. त्याच बराकमध्ये विजय गोयर याच्याजवळदेखील एक मोबाइल आढळला. हे दोन्ही मोबाइल जप्त करण्यात आले. या प्रकरणी त्यांच्यावर हर्सुल पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.
अक्षय याच्यावर बीड, औरंगाबाद, गंगापूर येथे खून, खुनाचा प्रयत्न करणे, लूटमार, शस्त्रे बाळगणे, मृत्यूस कारणीभूत ठरणे असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच विजय गोयर याच्यावर धुळे येथे विविध गुन्हे दाखल आहेत. सन 2018 मधे २०१८ पोट दुखीचे कारण पुढे करत अक्षय घाटीच्या वॉर्ड 10 मधे दाखल झाला होता. गोळी घेण्यासाठी पाणी घेण्याच्या बहाण्याने बंदोबस्तावरील पोलिस कर्मचा-याला मारहाण करुन उलट त्यालाच लॉकअपमध्ये कोंडून ठेवत अक्षय त्याच्यासोबत असलेल्या दोघा गुन्हेगारांसोबत पसार झाला होता. तपासणीच्या वेळ अक्षयजवळ मोबाईल सापडला मात्र त्यात सिम नव्हते. त्याने ते सिम काढून टाकले होते. त्याने कुणाकुणाला कॉल केले याचा शोध घेण्यासाठी सिमकार्डचा शोध घेतला जात आहे. गोयरच्या मोबाईलमधे देखील सिम गायब होते.