जळगाव : जळगावचे उप – महापौर कुलभुषण पाटील यांच्यावर काल गोळीबार झाला. या गोळीबारापुर्वी हल्लेखोरांनी उप महापौर कुलभुषण पाटील यांना तु जिवंत राहणार नाही असा दम दिला होता. तुझा गेम करु, सकाळी पेपरमधे मोठ्या बातम्या भरुन येतील. मात्र त्या बातम्या वाचण्यासाठी तु जिवंत राहणार नाही अशी हल्लेखोरांनी कुलभुषण पाटील यांना धमकी दिली होती.
या प्रकरणी उप महापौर कुलभुषण पाटील यांनी रामानंद नगर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे 25 जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नितीन भिमसिंग पाटील, निलेश ठाकुर, उमेश पाटील यांच्यात जुन्या कारणावरुन वाद झाला होता. याप्रकरणी समोरचे लोक पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्याचे समजल्यामुळे कुलभुषण पाटील पोलिस स्टेशनला गेले व त्यांनी आपसात समेट घडवून वाद मिटवला होता. त्यानंतर प्रत्येक जण आपल्या घरी गेला.
त्यानंतर रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन आला. पलीकडून बि-हाडे बोलत असल्याचे सांगणा-या व्यक्तीने त्यांना म्हटले की तु दुपारी पोलिस स्टेशनला समझौता घडवून आणला. नितीन राजपूतला माझ्याकडे आणणार होता. आम्ही त्याला सोडणार नाही. तु मधे पडला तर तुझा देखील गेम करु. पलीकडून बोलणा-या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न करत असतांना शिवीगाळ करत पलीकडून फोन कट झाला.
त्यानंतर उप महापौर पाटील यांना रात्री नऊ वाजेच्या सुमारास पुन्हा फोन आला. तु कुठे आहे? तु फार मोठा नेता झाला आहे काय? आज तुझा गेम करु. उद्याच्या पेपरमधे तुझ्या बातम्या येतील मात्र तु त्या बातम्या वाचण्यासाठी जिवंत राहणार नाही. त्यानंतर पुन्हा फोन कट झाला. त्यानंतर उप महापौर पाटील पिंप्राळा रस्त्याने घराच्या दिशेने त्यांच्या सहका-यासोबत दुचाकीने जात होते. त्याचवेळी वखारीजवळ एक कार तेथे आली. कारमधे बसलेल्यांनी पाटील यांची दुचाकी अडवली. वाहनात बसलेल्यांनी कारची काच खाली करत म्हटले की थांब कुल्या आज आम्ही तुझा गेम करणार आहे. तुला जिवंत सोडणार नाही. गाडीत महेंद्र राजपुत, त्याचा भाऊ उमेश राजपुत, मंगल राजपुत, बि-हाडे (पूर्ण नाव माहीत नाही) असे बसले होते त्यातील महेंद्र राजपुत व उमेश राजपुत यांनी गाडीतुन पिस्टल बाहेर काढली.
पिस्टल बघून उप महापौर पाटील घाबरले. मोटार सायकल चालवणा-या अनिल यादव याला घराच्या दिशेने जोरात दुचाकी दामटण्यास त्यांनी सांगितले. कारमधील सर्व जण त्यांचा पाठलाग करत होते. हनुमान मंदिराजवळ,आनंद मंगल कॉलनी जवळ कारमधून एक गोळी सुटलि. मात्र ती पाटील यांना लागली नाही. घाबरलेल्या अवस्थेत आलेल्या कुलभुषण पाटील यांनी घराबाहेर बसलेल्या परिवाराला तातडीने घरात पळून जाण्यास सांगितले. तेवढ्यात आलेल्या इनोव्हा गाडीतून आलेल्या सर्वांनी कुलभुषण पाटील यांना जोरजोरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महेंद्र राजपूत याने कुलभुषण पाटील यांच्या दिशेने एक गोळी झाडली. गोळीबार झाल्याचा आवाज ऐकून पाटील यांची पत्नी व मुले देखील घाबरली व गॅलरीत आली. दरम्यान महेंद्र राजपुत याने पाटील यांच्या दिशेने गोळीची एक फैर झाडली. त्या आवाजाने पाटील यांची पत्नी व मुले घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीत आले.
परिवारला बघून हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळी झाडली. पाटील यांनी घाबरुन पत्नी व मुलांना वॉल कंपाऊंडच्या मागे लपण्यास सांगितले. हल्लेखोरांनी पुन्हा पाटील यांच्या दिशेने फायर केले. या गोळीबारीचा आवाज ऐकून गर्दी जमली. गल्लीतील लोकांना शिवीगाळ करत कुणी मधे पडल्यास मारुन टाकण्याची धमकी सत्र सुरु करण्यात आले. आलेले सर्व हल्लेखोर आल्या पावली परत गेले. या घटनेची माहीती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पो.नि.अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास स.पो.नि.संदीप परदेशी करत आहेत.