जळगाव : मुलाला भेटण्यासाठी पत्नीसह ठाणे येथे गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून सोन्याचे दागिने व रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युनुस कालु खान हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचा मुलगा ठाणे येथे वास्तव्याला आहे. मुलाला भेटण्यासाठी युनुस खान सपत्नीक ठाणे येथे गेले होते. या कालावधीत त्यांचे मेहरुण गणेशपुरी भागातील बंद घरात चोरी झाली.
युनुस खान व त्यांची पत्नी असे दोघे ठाणे येथून आज सकाळी घरी परत आले. घरी आल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. या चोरीच्या घटनेत चाळीस हजार रुपये रोख, दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सहा हजार रुपये किमतीची कानातील सोन्याची रिंग, व सहा हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकुण 64 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.नि. शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी व गफ्फार तडवी करत आहेत.