मुंबई : डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्या प्रकरणी शिवसेनेच्या चौघा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील कांदिवली भागात सदर घटना मंगळवारी घडली होती. एकुण सहा शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर दोघे फरार आहेत.
कांदिवली पूर्व विभागातील रहिवासी असलेला राहुल शर्मा हा एका ई कॉमर्स साईटसाठी डिलिव्हरी बॉयचे काम करतो. मंगळवारी दुपारी पोईसर भागात तो डिलिव्हरीचे काम करत होता. त्याचवेळी अचानक मुसळधार पाऊस आला. पावसापासून बचाव करण्यासाठी त्याने शिवाजी मैदान परिसरातील शिवसेना शाखेजवळ आसरा घेतला. त्याठिकाणी शिवसेनेचा कार्यकर्ता चंद्रकांत निनवे हा आला व त्याने राहुल शर्माच्या ताब्यातील पार्सलवर पाय ठेवला. राहुलने चंद्रकांत यांना पार्सलवरुन पाय काढण्यास सांगितले.
दरम्यान दोघात झालेल्या बाचाबाचीनंतर चंद्रकांत आणि इतर शिवसैनिकांनी एकत्र येत राहुल याला बेदम मारहाण सुरु केली. या प्रकरणी राहुल शर्मा याने पोलिसांत रितसर तक्रार नोंदवली. या प्रकरणी एकुण सहा शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. इतर दोघे फरार आहेत.