जळगाव : रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या महिलेला तिच्या दिड वर्षाच्या मुलीसह शोधून काढण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली होती.
जळगाव शहरातील सत्तावीस वर्षाची विवाहिता घरगुती वादातून आपल्या दिड वर्षाच्या मुलीसह 6 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता घर सोडून निघून गेली होती. त्यामुळे हवालदिल झालेल्या तिच्या पतीने तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती महिला कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे अखेर त्या विवाहितेच्या पतीने एमआयडीसी पोलिस स्टेशनला आपली पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याबाबत मिसींग दाखल केली. मिसींग दाखल झाल्यानंतर एमआयडीसी गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांनी या बेपत्ता मायलेकींचा शोध सुरु केला.
बेपत्ता विवाहितेच्या पतीने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांची भेट घेत आपल्या पत्नीचा शोध लावण्याची विनंती केली. पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्यामुळे कासावीस झालेल्या तिच्या पतीला पो.नि. किरणकुमार बकाले यांनी धिर देत शोधकार्य सुरु केले.
स.फौ.विजय पाटील, दिनेश बडगुजर,नरेंद्र वारुळे, संदीप सावळे यांना याकामी रवाना करण्यात आले. सदर विवाहिता व तिची दिड वर्षाची मुलगी असे दोघे धुळे येथे आजीच्या घरी सुखरुप असल्याचा शोध लागला. दोघांना जळगावला आणल्यानंतर तक्रारदार पतीच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे तक्रारदार पती व त्याच्या नातेवाईकांनी पोलिस दलाचे आभार मानले.