अमरावती : चिखलदरासह मेळघाट परिसरात फिरणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला चिखलदरा नजीकच्या मडकी घाटात अडवत पोलिस असल्याची बतावणी करत लुटमारीचा गोरखधंदा करणाऱ्या तिघांच्या हातात चिखलदरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी 7 ऑगस्टच्या पहाटे साडेचार ते साडेपाच या कालावधीत अटकेतील तिघांनी लुटमारीचा उद्योग केल्याचे उघडकीस आले आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील जसापूर येथील आकाश दिलीप मोहेकर (27), गजानन सुभाष वाकोडे (30) आणि रुपेश सुभाष मोहेकर (35) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. परतवाडा ते चिखलदरा दरम्यान असलेल्या मडकी घाटात शनिवारच्या पहाटे या तिघांनी चारचाकी वाहनधारकांची लुटमार केली.
आकाश मोहेकर हा एका दुचाकीच्या बाजूला उभा होता. गजानन वाकोडे आणि रुपेश मोहेकर हे दोघे पर्यटकांच्या वाहनांना अडवत होते. वाहन उभे राहताच ‘आम्ही पोलिस आहोत, साहेब बाजुला उभे आहेत. तुमचे लायसन दाखवा, तुमच्या चेहऱ्यावर मास्क नाही अशा प्रकारे धाक दाखवत दंडाची रक्कम मागीतली जात होती. त्यानंतर पर्यटकांकडून हजाराच्या पटीत रक्कम वसुल केली जात होती. रक्कम देण्यास नकार देणा-यांना मारहाण करुन ती वसुल केली जात होती.
या प्रकाराबाबत संशय आल्यामुळे निखील मधुकर थेरे या पर्यटकाने चिखलदरा पोलिस स्टेशन गाठत माहिती दिली. माहिती मिळताच पो.नि. राहुल वाढवे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी हजर झाले. तिघा लुटारुंविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली.