अकोला : अमेरिकन सैनिक असल्याचे भासवत सेवानिवृत्त कर्मचा-याच्या फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून 25 कोटी रुपयांचे आमिष दाखवणा-या नायझेरियन आरोपीस अटक करण्यात आली आहे. सेवानिवृत्त कर्मचा-याला 57 लाख रुपयांचा गंडा घालण्यात नायझेरियन आरोपी यशस्वी झाला. तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून पुढील तपास सुरु आहे.
आत्माराम रामभाऊ शिंदे (68) रा. लहरिया नगर हे आरोग्य विभागातून विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर 7 मे 2021 रोजी नायझेरियन नागरिकाने आत्माराम शिंदे यांना फेसबुक रिक्वेस्ट पाठवली. ती रिक्वेस्ट शिंदे यांनी स्विकारली. त्यानंतर झालेल्या संभाषणादरम्यान आपण अमेरिकन सैनिक असून सध्या सिरिया बॉर्डरवर असल्याचे नायझेरियन नागरिकाने त्यांना सांगितले. तो म्हणाला की आपण सिरियामध्ये काम करत असताना आपल्याला एक बॉक्स सापडला आहे. त्या बॉक्समध्ये अमेरिकन डॉलर आहेत. ते डॉलर आम्ही तिघांनी वाटून घेतल्यानंतर आपल्या हिश्शावर 3.5 मिलियन डॉलर (भारतीय चलन 25 कोटी रुपये) आली असल्याचे पलीकडून झालेल्या संभाषणात शिंदे यांना सांगण्यात आले. ही रक्कम घेऊन आपण अमेरिकेत नेऊ शकत नसल्याचे नायझेरीयन आरोपीने त्यांना सांगितले.
या रकमेचे पार्सल तुमच्या नावावर भारतात पाठवतो. त्यातील तिस टक्के रक्कम तुम्ही घ्यायची उर्वरीत मी घेईन असे सांगण्यात आले. आत्माराम शिंदे यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाइल क्र., ई-मेल तसेच जवळ असलेले विमानतळ आदींची माहिती देखील त्याने घेतली. शिंदे यांनी देखील आपली सर्व माहिती त्यास दिली. सर्व माहिती घेतल्यानंतर पलीकडून नायझेरीयन नागरिकाने शिंदे यांना म्हटले की अँथनी नावाचा एजंट भारतात येणार आहे. तो दिल्ली विमानतळावरुन नागपुर येथे एक बॉक्स घेऊन येईल. त्याच्या सुचनेनुसार तुम्ही काम करायचे आहे.
त्यानंतर 12 मे रोजी अशोक नावाच्या व्यक्तीचा आत्माराम शिंदे यांना कॉल आला. त्याने दिल्ली विमानतळावरुन बोलत असल्याचे सांगत म्हटले की अँथनी विमानतळावर आलेला आहे. त्याला मराठी व हिंदी बोलता येत नसून मी पुणे येथील आहे. तुम्हाला कस्टम ड्युटी द्यावी लागणार आहे. ठरल्यानुसार शिंदे यांनी 74 हजार 999 रुपये वर्ग केले. त्यानंतर बाविस वेळा शिंदे यांनी 56 लाख 60 हजार 998 रुपये खात्यात जमा केले. वारंवार पैशांची मागणी सुरु असल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. त्यांनी खदान पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. तो गुन्हा सायबर पोलिसात वर्ग करण्यात आला. तपासाअंती नायझेरीयन नागरिकाला अटक करण्यात आली. त्याची चौकशी सुरु आहे.