जळगाव : राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने गीतकार तथा गायिका सुरेखा माणकचंद पोरवाल यांना ‘नारीरत्न पुरस्कार 2021’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे लवकरच वितरण होणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी म्हटले आहे.
जळगावच्या आदर्श नगरातील रहिवासी असलेल्या सुरेखा पोरवाल आदर्श माहेश्वरी महिला मंडळ, गायत्री भजनी मंडळ तसेच जळगाव शहर आणि तालुका महिला संघटनेच्या पदाधिकारी असून उत्कृष्ठ गायीका व गीतकार देखील आहेत.
विविध सामाजिक, धार्मिक, सत्संग कार्यक्रम अथवा अनेक प्रकारच्या गीतगायनाच्या स्पर्धेत त्यांचा उल्लेखनीय सहभाग असतो. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानात त्यांची जनजागृती सुरु असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन मशीन उपलब्ध करुन देण्याकामी त्यांनी योग्य प्रमाणात आर्थिक सहकार्य केले आहे.
लॉकडाऊन कालावधीत बेरोजगार झालेल्यांना धान्य, किराणा किट आदी स्वरुपात त्यांनी मदत केली आहे. गोशाळेतील विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. ‘बेटी आई है’ या शॉर्टफिल्ममध्ये देखील त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. पोरवाल ट्रेडींग कंपनीचे संचालक माणकचंद पोरवाल यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराचे लवकरच वितरण केले जाणार आहे.