पुणे : राज्यात सध्या ईडीच्या कारवायांनी धुमाकुळ घातला आहे. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यावसायीक अविनाश भोसले यांचावर देखील ईडीची वक्रदृष्टी पडली आहे. अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले या दोघांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. आज 9 ऑगस्ट रोजी अविनाश भोसले यांची जवळपास 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मागील महिन्यात भोसले यांची चार ते पाच तास चौकशी झाली होती. पुणे येथे एका सरकारी जमिनीवर भोसले यांच्या कंपनीकडून अतिक्रमीत बांधकाम केले जात असल्याची तक्रार नोंद झाली होती. या बांधकाम प्रकरणी अविनाश भोसले यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याच धर्तीवर अविनाश भोसले यांची ईडीच्या माध्यमातून चौकशी देखील सुरु आहे. यासोबतच भोसले यांच्या इतर अनेक गैर व्यवहाराची छाननी सुरु आहे. जप्त करण्यात आलेल्या भोसले यांच्या जमीनीचे मुल्य सध्या 4 कोटी 34 रुपये एवढे असल्याचे म्हटले जात आहे.
दक्षिण मुंबईत अविनाश भोसले यांनी विकत घेतलेल्या फ्लॅटची देखील चौकशी सध्या सुरु आहे. या फ्लॅटचे मुल्य 103 कोटी 80 लाख रुपये एवढे असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी ईडीने 11 फेब्रुवारी रोजी भोसले यांच्या विविध कार्यालयांवर छापेमारी केली होती. त्या कालावधीत भोसले यांचा मुलगा अमित भोसले याचीदेखील चौकशी झाली होती. त्यानंतर भोसले पिता पुत्र चौकशीला हजर झाले नव्हते.