जळगाव : फोटो काढण्याच्या उद्देशाने बोलावून फोटोग्राफरचा महागडा कॅमेरा व लेन्स हिसकावून जबरी चोरीसह पलायन करणा-या तिघांना जळगाव तालुका पोलिसांनी चोविस तासात जेरबंद केले आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गु.र.न. 232/21 भा.द.वि. 394, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सिध्देश कृष्णा महाजन या फोटोग्राफर तरुणास फोटो काढण्याच्या बहाण्याने 8 ऑगस्ट रोजी सकाळी कोल्हे हिल्स परिसरात फोन करुन बोलावण्यात आले होते. फोन करुन बोलावणा-यांना फोटोग्राफर सिद्धेश महाजन ओळखत नव्हता. फोटो काढण्यासाठी आलेल्या सिद्धेशच्या ताब्यातील पन्नास हजार रुपये किमतीचा महागडा कॅमेरा, व एमएम लेन्स असे साहित्य तिघांकडून हिसकावण्यात आले. जबरी चोरी करुन तिघा अज्ञात आरोपींनी घटनास्थळावरुन पलायन केले होते.
या गुन्ह्याच्या तपासकामी जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या निर्देशाखाली पो.हे.कॉ. सतिश हाळणोर, पो.हे.कॉ.अनिल फेगडे, पो.ना. सुशिल पाटील,पो.ना. विजय दुसाने, पो. ना. ललित पाटील, पो. ना. दिनेश पाटील, पो.कॉ. दिपक कोळी, चालक पो.कॉ प्रविण हिवराळे यांच्या पथकाने तपासकामाला सुरुवात केली.
पथकातील कर्मचा-यांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे यातील मुख्य आरोपी स्वराज संजय ठाकुर (19) न्यु लक्ष्मी नगर सावखेडा शिवार जळगांव यास सुरुवातीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीस गेलेला कॅमेरा हस्तगत करण्यात आला. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे दोघे साथीदार देखील ताब्यात घेण्यात आले. अजय राजु चव्हाण (20) व रुपेश गणेश साळवे (18) दोघे राहणार न्यु लक्ष्मी नगर सावखेडा शिवार अशी त्यांची नावे आहेत. या गुन्हयाचा पुढील तपास पो.हे.कॉ. अनिल बळीराम फेगडे करत आहेत.