नाशिक : सुर्यास्तानंतर महिलेस अटक न करण्याचा नियम असल्याचा फायदा नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांनी घेतला असल्याचे म्हटले जात आहे. आठ लाख रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांच्यावर काल 10 ऑगस्ट रोजी कारवाई करण्यात आली होती. वैशाली झनकर वीर या नाशिक जि.प.च्या माध्यमिक शिक्षणाधिकारी आहेत. रात्र झाल्यामुळे बुधवारी हजर व्हा अशी समज देऊन त्यांना घरी जावू देण्यात आले होते.
मात्र त्या न्यायालयात हजर झाल्या नाहीत. उस्मानाबाद भुम येथे एसीबीने ज्यावेळी रात्री महिला उप जिल्हाधिकारी राशीनकर यांच्यावर कारवाई केली होती. त्यावेळी देखील रात्र झालेली होती. मात्र एसीबीच्या पथकाने त्याच्या घरी रात्रभर मुक्काम ठोकला होता. तसा प्रकार या कारवाईत झालेला नाही. त्याचा फायदा वैशाली झनकर वीर यांनी घेतला असल्याचे आता म्हटले जात आहे.
तक्रारदाराच्या संस्थेच्या शाळांना मंजूर 20 % अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्याचा कार्यादेश काढून देण्यासाठी 27 जुलै रोजी तडजोडीअंती 8 लाख रुपये घेण्याचे वीर यांनी मान्य केले होते. एसीबीने आठ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली आहे. रात्री उशीर झाल्यामुळे वैशाली यांना समजपत्र दिल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र त्या न्यायालयात हजर झाल्या नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या फरार झाल्याचे न्यायालयात कथन केले. याप्रकरणी इतर आरोपी पंकज दशपुते आणि ज्ञानेश्वर येवले यांना तिन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वैशाली वीर यांच्यासह प्राथमिक शिक्षक आणि शासकीय चालकावर भद्रकाली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते व शासकीय चालक ज्ञानेश्वर येवले या दोघांना अटक करण्यात आली आहे.