नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील मंगरुळ येथे संगिता पती व मुलांसह गुण्यागोविंदाने नांदत होती. तिच्या लग्नाला एक तप अर्थात बारा वर्ष झाली होती. लग्नाला एक तप पुर्ण झाल्यानंतर एके दिवशी संगिताच्या पतीचे अकाली निधन झाले. पती निधनानंतर संगिता एकाकी झाली होती. एकाकीपण तिला खायला उठत होता. तिचे माहेर असलेल्या मंगरुळ या गावात पोपट संपत पवार हा तरुण रहात होता. माहेरी आली म्हणजे तिचा पोपट सोबत नजरेचा खेळ जुळून येत होता. त्यातूनच मंगरुळ येथील पोपट संपत पवार याच्याशी तिचे सुत जुळण्यास वेळ लागला नाही. हा चोरी चोरी चुपके चुपके प्रेमाचा खेळ पटकन कुणाच्या लक्षात आला नाही.
सन 2017 च्या दिवाळीत ती माहेरी मंगरुळ येथे आली. संगिता माहेरी आल्याचे बघून तिच्या आई वडीलांना हायसे वाटले. काही दिवस ती माहेरी राहिली. त्यानंतर सासरी जाते असे सांगून ती घराबाहेर पडली. सासरी जाण्याच्या नावाखाली घरातून बाहेर गेलेली संगिता थेट प्रियकर पोपट सोबत राहण्यास निघून गेली. कामधंद्यानिमीत्त पोपट दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे राहण्यास आला होता. संगिता देखील वनारवाडी येथे आपल्या मुलाला घेऊन पोपटसोबत भाड्याच्या खोलीत राहू लागली.
संगीता आणि पोपट यांचे पुर्वीपासूनच प्रेमसंबंध सुरु होते. मात्र त्याचा कुणाला थांगपत्ता लागला नव्हता. घरातून सासरी जाण्यासाठी निघालेली संगिता अद्याप सासरी का पोहोचली नाही म्हणून तिच्या सासरसह माहेरची मंडळी चिंताग्रस्त झाली. सर्वजण तिच्या शोधात होते. मात्र ती कुणाला सापडली नाही. काही महिन्यांनी संगिताने तिच्या भावाला फोन करुन माहिती दिली की मी आता पोपटसोबतच वनारवाडी येथे रहात आहे. पोपटने जिवनभर साथ देण्याचे वचन दिले असल्याचे देखील तिने तिच्या भावाला कथन केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून पोपट दररोज मद्यपान करुन घरी येतो आणि मला मारहाण करतो असे देखील तिने तिच्या भावाला फोनवर सांगितले.
आपल्या बहिणीचा शोध लागल्याचे समजल्याने त्याला व तिच्या आईवडीलांना आनंद झाला. मात्र त्यासोबतच पोपट मद्यपान करतो आणि तिला मारहाण देखील करतो हे समजल्याने सर्वांना वाईट देखील वाटले. तिच्या पतीचे निधन झाल्यामुळे तिला देखील पुरुषाचा सहारा हवा होता. तो सहारा तिला पोपटच्या रुपाने मिळाला होता. सुरुवातीला पोपटने तिला सुखात ठेवले. मात्र काही दिवसांनी तो तिला मद्यपान केल्यानंतर रोजच त्रास देऊ लागला.
संगिताचा भाऊ आणि नातेवाईक असे सर्वजण संगिताला भेटण्यासाठी वनारवाडी येथे आले. त्यांनी पोपटला समजावून सांगितले की झाले गेले विसरुन जा आणि पुढील वाटचाल दोघांनी मिळून व्यवस्थित करा. सर्वांसमोर पोपटने सकारात्मक भुमिका घेतली. मात्र काही दिवसांनी पोपट पुन्हा मद्यपान करु लागला. त्याच्या वागण्यात काही बदल झाला नाही. तो संगिताला मारहाण करु लागला. त्याच्या त्रासाला संगिता पार वैतागून गेली होती. त्याची शिवीगाळ व मारहाण तिला नकोशी झाली होती.
रोजच्या त्रासाला वैतागून तिच्या मनात आत्महत्येचे विचार येवू लागले. मात्र आपण आत्महत्या केली तर आपल्या मुलाचे कसे होईल. त्यांचे पालनपोषण कोण करणार या विचाराने ती पुन्हा दुखी: राहू लागली. त्यामुळे मुलाला देखील ठार करुन आत्महत्या करण्याचे विचार तिच्या मनात घोळू लागले. शेवटी मुलासोबतच आपण देखील या जगाचा निरोप घेण्याचा तिने मनाशी निश्चय केला.
4 ऑगस्टला ती आणि तिचा मुलगा असे दोघे घरात होते. घरात केवळ दोघेच जण असल्याचे बघून तिने दरवाजा आतून बंद केला. मनावर दगड ठेवत जिवापाड प्रेम करणा-या सात वर्षाच्या मुलाला तिने गळफास देत त्याची जिवनयात्रा संपवली. त्यांनंतर तिने गळफास घेतलेल्या अवस्थेतच त्याला घराच्या छताला बांधले. मुलाला ठार केल्यानंतर तिने देखील क्षणाचाही विलंब न करता छताला दोरीच्या मदतीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. अशा प्रकारे अगोदर तिने मुलाला ठार केले. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या करत आपले जिवन संपुष्टात आणले. अशा प्रकारे पोपटच्या रोजच्या त्रासाला वैतागून तिने आपली कायमची सुटका करुन घेतली. आपल्या पश्चात आपल्या मुलाची काळजी नको म्हणून त्याला देखील तिने ठार केले.
या घटनेची माहिती दिंडोरी पोलीस स्टेशनला समजताच पोलिस पथकाने घटनास्थळ गाठले. दत्तू नामदेव भेरे यांनी दिलेल्या खबरीनुसार सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. सदर अकस्मात मृत्यूची नोंद 57/21 या क्रमांकाने घेण्यात आली. संगीता बाबुराव गोधडे उर्फ संगीता प्रकाश पवार व तिचा मुलगा कार्तिक प्रकाश पवार यांच्या मृत्यूप्रकरणी संगिताचा भाऊ रविंद्र बाबुराव गोधडे याने फिर्याद दाखल केली. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोपट संपत पवार याच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा गु.र.न. 488/21 भा.द.वि. 306 नुसार दाखल करण्यात आला.
दरम्यान हवालदार शंकर खंडेराव जाधव यांच्या फिर्यादीनुसार संगीता प्रकाश पवार हिच्याविरोधात मुलगा कार्तिक(7) याची गळफास देत हत्या व स्वत: आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा गु.र.न. 489/21 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी पोपट संपत पवार यास अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलिस कोठडी सुनावली. आरोपी पोपट पवार सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे व त्यांच्या सहका-यांनी या गुन्ह्याचा तपास पुर्ण केला.