साड्यांच्या बॉक्समधून गुटख्याची वाहतुक

नाशिक : साड्यांची वाहतुक करत असल्याचा दिखावा करत त्या बॉक्समधून प्रत्यक्षात गुटख्याची वाहतुक सुरु असल्याचा प्रकार नाशिक ग्रामीण अंतर्गत पेठ पोलिसांच्या पथकाने उघड केला आहे. पेठ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे व त्यांच्या सहका-यांनी सदर कारवाई केली.

16 ऑगस्टच्या रात्री दोन वाजता पेठ पोलीस स्टेशन हद्दीत बलसाड ते नाशिक जाणा-या महामार्गावरील भारत पेट्रोल पंपासमोर टाटा अल्ट्रा कंपनीचा माल वाहतुकीचा संशयीत ट्रक (एमएच 16 सीसी 2842) अडवण्यात आला. या वाहनाचा चालक सुभाष नारायण पालवे (रा देवराई ता. पाथर्डी जि.अहमदनगर) व त्याचा साथीदार शिवाजी रामु कराड (रा.गजानन कॉलनी,ए 1,एम.आय.डी.सी.अहमदनगर) यांना ताब्यात घेत ट्रकमधील मालाची चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्यांनी साड्यांच्या बॉक्समधून गुटख्याची वाहतुक सुरु असल्याचे कबुल केले.

सदर संशयीत मालट्रक पेठ पोलीस स्टेशनला आणला असता त्यात सुमारे 38 लाख 19 हजार 200 रुपये किमतीचा अवैध गुटखा आढळून आला. त्यात विमल पान मसाला, सुगंधीत तंबाखु (गुटखा) यांचा समावेश होता. ट्रकसह एकुण 50 लाख 19 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत कायदेशीर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पेठ पोलीस स्टेशनला भा.द.वि. 328, 420, 188, 272, 273, 34 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे नियम व नियमनचे कलम 26(2), 27, 30(2)(अ) सह कलम 26(2) (iv), 3 (1) (ZZ) (i) (v), 27(3)(e), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रक चालक सुभाष नारायण पालवे (रा. देवराई ता.पाथर्डी जि. अहमदनगर) व त्याचा साथीदार शिवाजी रामु कराड (रा.गजानन कॉलनी, एमआयडीसी अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 20 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक पोलीस निरीक्षक संदिप वसावे आदी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here