नाशिक : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी विवस्त्र पुजा करावी लागेल असे सांगून विवाहितेवर बलात्कार करणा-या भोंदू बाबासह तिघांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.
बाबा कामिल गुलाम यासिन शेख (रा. जामा मशीद गंगापूर गाव), स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस (रा. कामटवाडे) व अशोक नामदेव भुजबळ (रा. सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. गंगापूर पोलिसांनी या तिघा जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे. तिघे सध्या अटकेत आहेत.
पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 13 डिसेंबर 202 ते 9 जानेवारी 2021 या कालावधीत तिच्या बहिणीचा मुलगा आजारी होता. त्यामुळे त्याला गंगापूर गाव येथील पठाडे गल्लीतील मशिदीनजीक असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बाबा कामिल शेख याच्याकडे उपचारार्थ नेले जात होते. या परिचयातून बाबा कामिल शेख याने पिडीतेला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. हळूहळू कामिल शेख याच्यासह त्याच्या साथीदारांनी विवाहितेचा विश्वास संपादन करत तिला विवस्त्र पुजेसाठी तयार केले. पुजा अवघड असली तरी त्या माध्यमातून पैशांचा पाऊस पडेल असे आमिष तिला दाखवण्यात आले. प्रत्येक बुधवारी विवस्त्र पुजा करण्यासाठी विवाहितेला प्रवृत्त करण्यात तिघांनी यश मिळवले. तिघांचा जाच असह्य झाल्यानंतर विवाहितेने पोलिसात धाव घेत आपली व्यथा कथन केली.
महिलेच्या फिर्यादीनंतर तिघांना अटक करण्यात आली. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अटकेतील तिघांना तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.