नाशिक : आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर – वीर यांना तिन वेळा पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्य न्यायालयीन कोठडीचे आदेश देण्यात आले आहे. मात्र प्रकृती अस्वास्थेच्या कारणामुळे त्यांचा मुक्काम रुग्णालयातच आहे.
अटकेनंतर सुरुवातीला वैशाली झनकर यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र प्रकृती अस्वास्थतेचे कारण पुढे करत त्या दोन्ही दिवस रुग्णालयातच होत्या. चौकशीकामी ठाणे एसीबीच्या पथकाला वेळ मिळाला नसल्यामुळे त्यांची पोलिस कोठडी पाच दिवस वाढवण्यात आली होती. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्यांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र वैद्यकीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर त्या पुन्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचाराकामी दाखल झाल्या आहेत. कारवाईच्या वेळी रात्र झाल्यामुळे झनकर यांना सकाळी पुन्हा हजर होण्याची समज देत सोडून देण्यात आले होते. मात्र त्या नाट्यमय रित्या गायब झाल्या होत्या व तशाच पद्धतीने पोलिसांना शरण देखील आल्या.
वैशाली झनकर यांच्या सांगण्यावरुन वाहनचालक ज्ञानेश्वर येवले, राजेवाडी येथील प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना आठ लाख रुपयांची लाच स्विकारतांना जि.प. कार्यालयातच रंगेहाथ पकडण्यात आले होते. भद्रकाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.