जळगाव : रिक्षात बसलेल्या प्रवाशाची जबरी लुट करणा-या चौघांपैकी दोघा फरार आरोपींना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अशरद उर्फ अण्णा शेख हमीद (22) गेंदालाल मिल जळगाव व अशरफ गफ्फार पिंजारी (20) रा. फातीमा नगर एमआयडीसी जळगाव असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापैकी मोहसीन खान नुरखान तसेच शाहरुख शेख रफीक शेख या दोघांना त्याच दिवशी 8 जुन रोजी अटक करण्यात आली आहे.
8 जून 2021 रोजी अब्दुल कलीम गफूर शेख हे जामनेर येथून जळगावला बसने बाजारात वस्तू खरेदीसाठी आले होते. जळगाव शहराच्या अजिंठा चौफुलीवर ते बसमधून खाली उतरले व चित्रा चौकात जाण्यासाठी शेअरींग रिक्षात बसले होते. त्या रिक्षात अगोदरच रिक्षाचालकाच्या संमतीने प्रवाशाच्या रुपात लुट करणारे तिघे आरोपी बसले होते. अगोदरच बसलेल्या लुटारु साथीदारांच्या मधोमध अब्दुल शेख यांना हेतूपुरस्सर बसवण्यात आले. वाटेत वैकुंठ धाम नजीक धक्काबुक्की करत त्यांना खाली उतरवून देण्यात आले. दरम्यान रिक्षातील प्रवाशांच्या रुपात बसलेल्या लुटारुंनी त्यांच्या खिशातील 25 हजार रुपयांची रक्कम बळजबरी काढून घेत लुट केली होती.
भेदरलेल्या अब्दुल कलीम यांना रिक्षाचा क्रमांक टिपून घेण्याचे घटनेच्या वेळी सुचले नाही. मात्र लुट करणा-या प्रवाशांच्या शरीरयष्ठीचे आणि रिक्षाचे वर्णन त्यांनी लक्षात ठेवले होते. या वर्णनाच्या आधारे त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला त्यावेळी रितसर फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला.
सुरुवातीच्या तपासात मोहसीन खान नुरखान व शाहरुख शेख रफीक या दोघा संशयीतांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी अटकेतील दोघांकडून गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षा व 15 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले होते.
गुन्हा घडल्यापासून व दाखल झाल्यापासून अशरद उर्फ अण्णा शेख हमीद व अशरफ गफ्फार पिंजारी हे दोघे फरारच होते. दोघे आरोपी जळगाव शहरात आले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सय्यद, सुधीर साळवे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, साईनाथ मुंडे आदींनी अनुक्रमे गेंदालाल मिल व फातिमानगर जळगाव येथून ताब्यात घेत अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.