पिस्तुलच्या धाकावर दुचाकीस्वारास लुटणारे तिघे अटकेत

जळगाव : रात्रीच्या वेळी घरी जात असलेल्या हॉटेलचालकाच्या खिशातील चाळीस हजार रुपयांची रोकड पिस्तुलचा चाक दाखवत जबरीने लुटणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रातोरात अटक करण्यात यश मिळवले आहे. 17 ऑगस्टच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास महाबळ कॉलनीनजीक बाहेती शाळेजवळ सदर घटना घडली होती.

गणेश दुलाराम महाजन यांची जळगावच्या नविन बस स्थानक परिसरात हॉटेल आहे. 17 ऑगस्ट रोजी रात्री हॉटेलचे कामकाज आटोपून ते आपल्या ताब्यातील दुचाकीने महाबळ परिसरातील गाडगेबाबा नगरच्या दिशेने जात होते. दरम्यान वाटेत बाहेती शाळेजवळ ट्रिपलसिट चालवणा-या बुलेटस्वाराने त्यांना  ओव्हरटेक करत त्यांची वाट अडवली. त्यातील अरबाज दाऊद पिंजारी नावाच्या इसमला गणेश महाजन ओळखत होते. इतर दोघे मात्र त्यांना परिचीत नव्हते. तिघे बुलेटच्या खाली उतरले व त्यांनी गणेश महाजन यांना देखील दुचाकीवरुन खाली उतरण्यास भाग पाडले. त्यातील अरबाज पिंजारी याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तुल काढत गणेश महाजन यांना घाबरवण्यास सुरुवात केली. इतर दोघांनी महाजन यांना चल पैसे काढ तुझ्याजवळ किती पैसे आहेत असे म्हणत धमकावण्यास सुरुवात केली.

गणेश महाजन यांनी नकार दिला असता त्यातील एकाने थेट त्यांच्या खिशातील अंदाजे चाळीस हजार रुपयांची रोकड जबरीने काढून घेतली. पोलिसात तक्रार दिल्यास तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देण्यास तिघे विसरले नाही. त्यानंतर तिघे बुलेटने पसार झाले. या सर्व प्रकारामुळे भेदरलेल्या गणेश महाजन यांनी काही वेळाने रामानंद नगर पोलिस स्टेशन गाठत रितसर फिर्याद दाखल केली. सदर गुन्हा रामानंद नगर पोलिस स्टेशनला गु.र.न. 241/21 भा.द.वि. 392, 504, 506, 34 तसेच आर्म अ‍ॅक्ट 3/25 नुसार दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरण कुमार बकाले यांच्या पथकातील    यांनी सुरु केला. रात्रभर जंगजंग पछाडत या गुन्ह्यातील अरबाज दाऊद पिंजारी रा. हरीविठ्ठल नगर, जळगांव, अरबाज रउफ पटेल, मच्छी बाजार, तांबापुरा, जळगांव व मुद्दसर शेख सलीम रा. छोटी मशीदच्या बाजुला, तांबापुरा, जळगांव यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली बुलेट व पिस्तुल हस्तगत करण्यात आली आहे.

अटकेतील मुख्य आरोपी अरबाज पिंजारी हा सुपारी घेऊन हल्ला करण्याचे काम करत असल्याचे सांगण्यात येते. त्याच्यावर यापुर्वी रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील आर्यन पार्क परिसरात नगरसेवक संतोष पाटील (हटकर) यांच्यावरील हल्ल्याचा आरोप आहे. याशिवाय चाळीसगाव येथील एका हल्ल्यात देखील याचा सहभाग असल्याचे समजते. याशिवाय मालाविरुद्ध्चे विविध गुन्हे अटकेतील अरबाज पिंजारी याच्यावर दाखल आहेत. सुपारी घेऊन गुन्हे करण्याकामी अरबाज पिंजारी कुविख्यात असल्याचे म्हटले  जाते. या गुन्ह्याचा पुढील तपास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी करत आहेत.

या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार श्रीकृष्ण पटवर्धन, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, प्रदिप पाटील, नरेंद्र वारुळे, जयंत चौधरी, सुनिल दामोदरे, राहुल पाटील, विजय पाटील, प्रितम पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासात पोलिस निरीक्षक किरण शिंदे, तपासी अंमलदार स.पो.नि. संदीप परदेशी, पो.ना. संदिप महाजन, शिवाजी धुमाळ, व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींकडून गुन्हयात वापरलेली बुलेट व गावठी पिस्तुल हस्तगत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here