मुंबई : राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे आज पहाटे कोरोनाच्या संसर्गाने दुर्दैवी निधन झाले. त्या १९७२ च्या आयएएस बॅचमधील सनदी अधिकारी होत्या.नीला सत्यनारायण यांना कोरोना संसर्ग झाला होता.
त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त अशी त्यांची ओळख होती.
नीला सत्यनारायण यांनी आपल्या सेवा काळात मुलकी खाते, गृहखाते,वनविभाग, माहिती व प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास अशा विविध खात्यांत सनदी अधिकारी म्हणून सेवा बजावली.कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.
निवृत्तीनंतर त्यांची राज्याच्या निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीकरण्यात आली होती.नीला सत्यनारायण यांचे साहित्य लोकप्रिय झाले होते. हिंदी,मराठी, इंग्रजी या भाषेतून त्यांनी पुस्तके लिहिली. शिवाय त्या संवेदनशील कवयित्री म्हणून देखील प्रसिद्ध होत्या. त्यांच्या निधनाने संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.