मनिषाचा खून करुन नितीनने तिला पुरले !—– प्रेयसी संध्याचा गळा आवळून नंतर मारले !!

सातारा : कोणताही गुन्हा कधीच लपून राहत नाही. कधीना कधी त्याला वाचा फुटते आणि आरोपी कितीही हुशार असला तरी पोलीस त्याला शोधून काढतात. गुन्हा करणाऱ्याने कितीही सफाईदार पद्धतीने गुन्हा केला असला तरी काहीना काही पुरावा मागे राहिलेला असतो. तो पुरावाच पोलिसांसाठी तपासाकामी महत्वाचा दुवा होत असतो. वाई तालुक्यातील व्याजवाडी-व्याहाळ येथील नितीन गोळे याने अगोदर अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा खून केला. त्यानंतर लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीला मार्गातून हटवले. मात्र पोलिसांनी नितीनला प्रेयसी संध्या शिंदे हिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करताच त्याने पत्नीच्या हत्येची देखील कबुली दिली.

वाई तालुक्यातील व्याजवाडी-व्याहाळ येथे नितीने गोळे हा आपल्या पत्नी मुलासह रहात होता. सुमारे विस वर्षापूर्वी त्याचे मनिषासोबत लग्न झाले होते. नितीन हा सैन्यात काही वर्ष नोकरी करुन आपल्या गावी परत आला होता. त्यांनतर मिळेल ते काम तो करत होता. सध्या तो माथाडी काम करत होता. वास्तविक लग्नानंतर त्याचे पत्नी मनिषासोबत पटत नव्हते. कोणत्या ना कोणत्या कारणातून पती पत्नीचे वाद सुरुच रहात होते. या वादात तो मनिषाला मारहाण देखील करत होता. पती नितीनचे बाहेरख्याली संबंध मनिषाला समजले होते. त्यामुळेच ती नितीनसोबत वाद घालत होती. कितीही झाले तरी ती त्याच्या लग्नाची बायको होती.

परस्त्रीचा नाद सोडण्यासाठी ती पती नितिनसोबत वाद घालत होती. तिचे म्हणणे रास्त होते. मुलाबाळाकडे व संसाराकडे लक्ष देण्यास ती सांगत होती. परंतू नितीन हा प्रेयसी संध्याच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. त्याला तिच्याशिवाय दुसरे काही सुचतच नव्हते. नितिनच्या दृष्टीने पत्नी मनिषा त्याच्या व संध्याच्या संबंधातील अडथळा होती. त्यामुळे मनिषाला आपल्या वाटेतून दुर सारण्याचा सल्ला संध्याने नितीनला दिला होता. प्रेयसी संध्याच्या सांगण्यानुसार मनिषाचा खून करण्यास नितीन तयार झाला होता. तसे ती त्याला नकोच होती. तो संध्यालाच आपली पत्नी मानत होता. शिवाय मनिषाला सोडा म्हणून संध्या देखील त्याच्या मागे हात धुवून लागली होती. दोन बायकांच्या कात्रीत तो सापडला होता. अखेर त्याने पत्नी मनिषाचा कायमचा काटा काढण्याचे मनाशी ठरवले.

त्याने एक प्लॅन तयार केला. सुमारे अडीच वर्षापूर्वी त्याने या प्लॅनला मुर्त स्वरुप दिले. दि.1 मे 2019 रोजी त्याचे पत्नी मनिषा सोबत संध्याच्या विषयावरुन जोरदार वाद घातला. त्या वादात त्याने मनिषाचा गळा आवळून धरला. त्याचा प्रतिकार करण्यात मनिषा कमी पडली व जागीच मरण पावली. ती मयत झाल्याची खात्री होताच नितीन मनातून घाबरला. मात्र त्याने वेळ न दवडता तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. तसे त्याने संध्याच्या सांगण्यावरुन अगोदरच ठरवले होते. पत्नी मनिषाचा मृतदेह घेऊन तो त्याच रात्री गावाजवळच्या वैराट गडच्या पायथ्याशी गेला. तेथे त्याने तीस फुट खोल एक खड्डा खोदून त्यात तिचा मृतदेह पुरला. ही घटना त्याला आणि त्याची प्रेयसी संध्या या दोघांनाच माहित होती. त्यामुळे या घटनेची वाच्यता होण्यापुर्वीच नितीन गोळे याने वाई पोलीस स्टेशनला पत्नी मनिषा नितीन गोळे (35) ही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर देखील मनिषाचा लवकर शोध लागला नाही. उलट नितीनने पोलीसांना वेगवेगळी तर्कसंगत माहिती देत दिशाभुल करण्याचेच काम केले. त्यावेळी पोलीसांच्या लक्षात हा प्रकार आला नाही.त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलीस बेपत्ता मनिषाचा शोध घेत होते. काही महिन्यानंतर पोलीसांचा तपास थंड बस्त्यात पडला. नेमके हेच नितीनच्या पथ्यावर पडले. पत्नीचा खून करुन आणि पुरावा नष्ट करून तो नामानिराळा आणि निर्धास्त राहिला. कुणाला कशाची ही भनक लागली नाही. मनिषाच्या नातेवाईकांनी देखील त्यावेळी या घटनेकडे फारसे गांभीयाने लक्ष दिले नव्हते. त्यांना जावयाचे बाहेरख्याली लफडे माहित नव्हते. मात्र नितीनचे विवाहबाहय संबध फार दिवस लपले नाही.

संध्या ही नितीनला लग्न कर म्हणून तगादा लावत होती. या कारणातून दोघांचे वाद होऊ लागले. पत्नी मनिषाचा खून करुन अडीच वर्ष उलटली होती. पोलीस देखील त्याच्यापर्यंत पोहचले नव्हते. सगळे काही आलबेल सुरु होते. त्यामुळे संध्या त्याला लवकर लग्न करण्याचा तगादा लावत होती. मात्र संध्यासोबत लग्न केले तर आपण समाजाच्या व पोलिसांच्या नजरेत येऊ आणि कदाचीत आपला गुन्हा उघड होऊ शकतो अशी भिती त्याला सतावत होती. त्यामुळे तो लग्नाचा विषय टाळत होता. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यास तो तिला सांगत होता. मात्र ती काही त्याचे ऐकत नव्हती. ती त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावतच होती. तिने देखील नितीनसाठी तिच्या पतीला सोडून दिले होते. ती एका दवाखान्यात नर्सचे काम करत होती. हळूहळू दोघांचे प्रेमसंबंध समाजात सर्वांना समजू लागले. ते संबंध फार दिवस लपू शकले नाही. संध्याची लग्नाची मागणी तो पुर्ण करण्यास तयार नव्हता. ती त्याला केवळ सुखासाठी हवी होती. मात्र आता तर ती त्याला हात देखील लाऊ देत नव्हती.

दि. 31 जुलै 2021 रोजी संध्याला नितीनने भेटायला बोलावले. आपण लग्न करु असे म्हणत गोड बोलून तो तिची समजूत घालत शरीरसुखाची मागणी करु लागला. त्यात तो यशस्वी झाला. त्याने तिच्यासोबत शरीरसुखाचा आनंद लुटला. मात्र त्यानंतर पुन्हा दोघात लग्नाच्या विषयावरुन वाद सुरु झाला. तिच्या बोलण्याचा नितीनला राग आला. त्या वादातून त्याने तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली. त्यात ती मरण पावली. ती मेल्याची खात्री होताच नितीनने तिच्या देखील मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. वाई तालुक्यातील आसले गावच्या हद्दीत असलेल्या ऊसाच्या शेतात त्याने तिचा मृतदेह टाकून दिला. रात्रीच्या अंधारात त्याने तिच्या जवळ काही आहे का नाही याची चाचपणी देखील केली नाही. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून तो घाईघाईत निघून आला.

दि. 31 जुलै 2021 रोजी घरातून निघून गेलेली संध्या लवकर घराकडे परत आली नाही. त्यामुळे तिच्या घरच्या लोकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार भुईज पोलीसांना दिली. कामावर जात असल्याचे सांगून ती घरातून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. बेपत्ता संध्या शिंदेचा शोध पोलिस घेत असतांना ऊसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पडला असल्याची माहिती 3 ऑगस्ट 2021 रोजी भुईज पोलीसांना समजली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मृतदेहाच्या शेजारी मयताचे आधारकार्ड तसेच इतर कागदपत्रे पोलीसांना मिळाली. त्या कागदपत्राच्या आधारे तो मृतदेह सौ.संध्या विजय शिंदे (32) हिचा असल्याचे पोलीसांना समजले. तिचा गळा आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. तिचे हातपाय देखील बांधलेले होते. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा देखील स्पष्ट दिसत होत्या.पोलीसांनी या घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनकामी सातारा सरकारी रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर लागलीच पुढील तपासाला गती देण्यात आली.

संध्याची हत्या कुणी व कशासाठी केली याचा तपास पोलीस करत असतांना संध्याच्या मोबाईल कॉलचा तपशील मिळवला. तिच्या मोबाईलवर गेल्या काही दिवसांपासून नितीन गोळे या इसमाचे अनेकवेळा फोन आलेले होते. नितीन आणि संध्या या दोघांचे विवाहबाहय संबंध असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्या माहीतीच्या आधारे पोलिस तपासाने वेग घेतला. दरम्यानच्या कालावधीत नितीन फरार झाला होता. पोलिस त्याच्या मागावर होते. संशयीत नितीन गोळे हा कर्नाटकातील बेळगाव नजीकच्या एका गावात त्याच्या नातेवाईकाकडे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसाचे एक पथक त्याच्या शोधार्थ बेळगावला रवाना करण्यात आले. भुईज पोलीसांनी तेथेच त्याला हुडकून काढले.

त्याने संध्या शिंदे हिच्या खूनाची कबुली देत असताना अडीच वर्षापूर्वी पत्नी मनिषा गोळे हिचा देखील खून केल्याचे व तिचा मृतदेह वैजारवाडी डोंगराच्या पायथ्याशी पुरला असल्याचे कबुल केले. पोलीसांनी त्याला वैजारवाडी डोंगरपायथ्याशी नेले. त्याने दाखवलेल्या जागेवर जेसीबीच्या सहाय्याने खड्डा उकरुन मनिषाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचे अवशेष तेवढे शिल्लक राहिले होते. तलाठी आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या समक्ष या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.

दोन्ही गुन्ह्यात पोलीसांनी त्याला अटक केली. पत्नी मनिषा नितीन गोळे (35) आणि प्रेयसी संध्या विजय शिंदे (32) या दोघांचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी नितीन आनंदराव गोळे (38) याच्या विरुद्ध दुहेरी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भा.दं.वि. 302, 201 प्रमाणे नोंद करण्यात आला. त्याला सातारा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उप अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here