औरंगाबाद (वाळूज) : काही महिन्यांपुर्वी वाळूज येथे राहण्यास आलेल्या पती पत्नीत सतत वाद सुरु होते. या वादाला वैतागून पत्नी तिच्या आईसोबत माहेरी निघून जाण्याच्या बेतात होती. 21 ऑगस्ट रोजी पत्नी माहेरी जाण्याच्या तयारीत असतांना पतीने पत्नीच्या हातातील तिन महिन्याचे बाळ हिसकावून घेतले. हिसकावलेल्या बाळाला सोबत घेत पतीने रिक्षाने पळ काढला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आपल्या बाळाचे काय होणार अशा विवंचनेत पत्नीने वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत आपली कैफीयत मांडली.
अहमदनगर जिल्ह्यातील डोंगरगंज येथील या जोडप्याने आंतरजातीय विवाह केला आहे. बांधकाम करणा-या पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हे मुल माझे नाही असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली होती. तिने हा प्रकार तिच्या आईला कथन केल्यामुळे तिची आई मुक्कामी आली होती. रात्रभर तिची आई मुक्कामी राहिल्यानंतर दुस-या दिवशी दोघी मायलेकी घरी जात असतांनाच पतीने पत्नीच्या हातातील मुल हिसकावत पळ काढला. त्यानंतर काही तासाने त्याने बाळासोबत सेल्फी काढून पत्नीच्या मोबाइलवर पाठवली. अधुनमधून फोन करुन “तु अहमदनगरला ये तेथे आपण भेटू” असे म्हणत फोन कट केला व त्याचा नंतर त्याचा संपर्क झाला नाही. याप्रकरणी पतीविरुद्ध बाळाच्या चोरीसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.