वयोवृद्ध प्रयागबाईच्या अंगी नव्हतेच त्राण—- मुसळीच्या घावात मुलाने घेतले तिचे प्राण

बीड : मद्याची नशा जेवढी जास्त तेवढी मनुष्याची मती गुंग होत असते. मद्याच्या अती आहारी गेल्यावर मनुष्याला जगाचे फारसे भान रहात नाही. आपण काय करत आहेत, काय बोलत आहोत याचे भान मद्यपी व्यक्तीला नसते. नशेची धुंदी उतरल्यावर त्याला आपल्या कृत्याची आणि वक्तव्याची जाणीव होते.

बीड नजीक असलेल्या चौसाळा येथील तरुणाने मद्याच्या नशेत जन्मदात्या आईलाच काठी, चप्पल व मुसळाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. मुसळाचा वार आईच्या डोक्यात बसल्याने तिचा जागीच अंत झाला. मद्याच्या अधीन झालेल्या मुलाची नशा सकाळी कमी झाली. त्यावेळी त्याला आपल्या हातून आईची हत्या झाल्याचे लक्षात आले. पोलिसांच्या भितीने त्याने सात वर्षाच्या मुलाला सोबत घेत सासरवाडीकडे पलायन केले. सासरवाडीला मुलाला ठेवून अजून पुढे पलायन करण्याचा त्याचा बेत होता. मात्र तत्पुर्वीच मागावर असलेल्या पोलिसांनी गेवराईनजीक असलेल्या राक्षस भुवनाजवळ गाठले.

बिड नजीक चौसाळा येथील शाहूनगर परिसरात पांडुरंग मानगीरे राहतात. त्यांना व त्यांचा मुलगा मदन या दोघांना मद्यपान करण्याची सवय आहे. पिता पुत्राच्या मद्याच्या व्यसनामुळे दोघांच्या बायका त्यांना वैतागल्या होत्या. पांडुरंग मानगिरे यांची पत्नी वयोवृद्ध असल्यामुळे ती सर्व निमुटपणे सहन करत होती. मात्र मदनची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. घरात केवळ पांडुरंग मानगिरे, त्यांची पत्नी प्रयागबाई व मदनसह त्याचा सात वर्षाचा मुलगा असे रहात होते. दोघा पितापुत्रांचे दारु पिण्याचे व्यसन परिसरातील सर्व रहिवाशांना माहिती होते. त्यामुळे त्यांच्या घरात रोजच्या होणा-या भांडणाला लोक परिचीत होते. त्यामुळे कुणी त्यांच्या घरात लक्ष देत नव्हते.

शुक्रवार 20 ऑगस्टच्या रात्री अकरा वाजले तरी पांडुरंग मानगीरे घरी आलेले नव्हते. घरात केवळ त्यांची पत्नी प्रयागबाई व मदनचा मुलगा असे हजर होते. त्याचवेळी मदन मद्याच्या नशेत हेलकावे खात घरी आला. आल्या आल्या त्याने आई प्रयागबाईला कोणत्यातरी कारणावरुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शब्दामागे शब्द वाढत होता. मद्याच्या नशेत आकंठ बुडालेल्या मदन याने जन्मदात्या आईलाच मारहाण करण्यास सुरुवात केली. हातात चप्पल, काठी व मुसळ या वस्तूंच्या मदतीने त्याने जन्मदात्या आईला बेदम मारहाण सुरु केली. मद्याच्या नशेत त्याला काही सुचत नव्हते. मिळेल त्या जड वस्तूने तो आईला मारहाण करतच होता. डोक्यात मुसळाचा घाव बसल्यामुळे काही वेळातच त्याची आई प्रयागबाई जमीनीवर कोसळली व ठार झाली.  आपल्या हातून काय झाले याची त्याला मद्याच्या नशेत असल्यामुळे फारशी कल्पना आली नाही. तो आपल्या जागेवर जाऊन झोपी गेला.

या घटनेनंतर मदनचे वडील व मृत झालेल्या प्रयागबाईचे पती पांडुरंग मानगिरे आले. पत्नी प्रयागबाई रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिला दवाखान्यात नेण्याचे ठरवले. मात्र रात्रीचे अकरा वाजून गेले होते. तसेच घराबाहेर पाउस देखील पडत होता. त्यामुळे ते हतबल झाले. त्यांच्या घरात रोजचा वाद असल्यामुळे परिसरातील कुणीही त्यांच्याकडे आले नाही. त्यामुळे सकाळपर्यंत प्रयागबाईचा मृतदेह घरात तसाच पडून होता.

सकाळी मद्याची नशा उतरल्यानंतर मदन झोपेतून उठला. आपल्या हातून आईचा खून झाला असल्याची जाणीव त्याला झाली. आता पोलिस आपल्याला पकडतील ही भिती त्याला सताऊ लागली. त्यामुळे त्याने लागलीच आतल्या सात वर्षाच्या मुलाला सोबत घेत दुचाकीने सासरवाडीला जाण्याची तयारी केली. आईचा मृतदेह तसाच पडू देत तो मुलासोबत सासरवाडीला निघाला. मुलाला सासरवाडीला नेल्यानंतर एकट्यानेच कुठेतरी पळून जाण्याचे त्याचे पुढचे नियोजन होते.

या घटनेची माहिती कुणीतरी  नेकनूर पोलिस स्टेशनला कळवली. माहिती मिळताच नेकनूर पोलिस स्टेशनचे स.पो.नि. लक्ष्मण केंद्रे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले. हल्लोखोर मुलगा मदन पळून गेल्याचे समजताच त्याचा माग काढत पोलिस पथक त्याच्या शोधात निघाले होते. पोलिस उप निरीक्षक विलास जाधव व त्यांच्या सहका-यांनी त्याचा माग काढत पाठलाग सुरु केला. आईचा मारेकरी मदन सासरवाडीला गेला असल्याचे समजल्यानंतर पोलिस पथकाने तिकडे मोर्चा वळवला. तब्बल दीड ते दोन तास पाठलाग केल्यानतंतर त्याला जालना जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात पथकाला यश आले. दरम्यान मयत प्रयागबाईच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मदन मानगिरे याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here