धरण फुटीची वर्तवली जात आहे शक्यता, पाण्याचा अपव्यय
गोंदीया : गोंदीया जिल्हयातील सालेकसा तालुक्यात कालीसरार धरण आहे. या धरणाच्या दुरुस्ती व देखभालीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे. धरणाच्या भिंतीचे लिकेज वाढत असल्यामुळे पाण्याच्या नासाडीसह धरण फुटण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
महाराष्ट्राच्या सिमेलगत बिजेपार ग्रामपंचायतीच्या परिसरात हे धरण आहे. या धरणातून पाणी सिंचन करण्यासाठी वेगवेगळे कालवे नाहीत. कालवे नसल्यामुळे या धरणाचे पाणी गरजेनुसार थेट पुजारीटोला धरणात सोडले जाते व तेथूनच पाण्याचे वितरण केले जाते.
दरम्यान या धरणाच्या देखभाल व दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले जात आहे. पाण्याची होत असलेली नासाडी लपवण्यासाठी बाष्पीभवनामुळे पाणी कमी झाल्याचे उत्तर दिले जात असल्याची देखील ओरड होत असते.
धरणाच्या भिंतींना पडणा-या लिकेजेसमुळे पाण्याची नासाडी होत असल्याचे बोलले जात आहे. कालीसरार धरणाचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित ठेवले जाते. मात्र उन्हाळा येण्यापुर्वीच या धरणातील पाणी कित्येकदा रिकामे होत असते. नक्षलवादी भागातील या धरणाच्या देखभालीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.