बीड – बिड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे महादेव बलभीम औटे हे शेतकरी रहात होते. पत्नी गंगुबाई, मोठा मुलगा योगेश आणि धाकटा गणेश अशांसह ते रहात होते. पत्नी गंगुबाईला पक्षाघात झालेला असल्याने ती अंथरुणालाच खिळून होती. मोठा मुलगा पुणे येथे नोकरीला होता. मात्र लॉकडाऊन कालावधीत त्याची नोकरी गेली. त्यामुळे तो गावी पारनेर येथे आला होता. महादेव औटे व त्यांचा मोठा मुलगा योगेश या दोघांना दारु पिण्याचे व्यसन होते. या परिवाराकडे बारा एकर जमीन होती. या जमीनीची वाटणी अद्याप झालेली नव्हती. त्यामुळे घरात कलह सुरु होता. तशातच महादेव औटे यांना दारु पिण्याचा नाद होता. हाती पैसे आले म्हणजे ते दारु पिण्यास जात होते. त्यांचा हा दारुवर पैसे खर्च करण्याचा नाद घरातील सदस्यांना आवडत नव्हता. जमीनीची वाटणी झालेली नसतांना महादेव औटे हे शेतीवर पिककर्ज घेण्याच्या तयारीत होते. महादेव औटे यांनी पिककर्ज घेतल्यास हाती आलेली रक्कम ते दारु पिण्यात खर्च करुन टाकतील अशी भिती त्यांचा मोठा मुलगा योगेश यास सतावत होती. त्यामुळे त्याचा पिककर्ज घेण्यास विरोध होता. त्यातून घरात वाद सुरु होते.
सोमवार 23 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे योगेशचे त्याचे वडील महादेव औटे यांच्यात वाद सुरु झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत होण्यास वेळ लागला नाही. हाणामारीच्या वेळी मुलगा योगेश याने जन्मदात्या महादेव औटे यांच्यावर थेट कु-हाड चालवली. या हल्ल्यात महादेव औटे जखमी झाले. त्यानंतर काही वेळाने सर्वजण झोपी गेले. मात्र गंभीर जखमी अवस्थेतील महादेव औटे यांनी झोपेतच आपले प्राण सोडले होते. मध्यरात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा लहान मुलगा गणेश यास शंका आली. आपल्या वडीलांचा आवाज बंद झाल्याचे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे आलेल्या शंकेतून त्याने पाहिले असता त्याचे वडील महादेव औटे मयत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यामुळे त्याने सर्वांना हा प्रकार सांगून जागे केले. आपल्या वडीलांच्या खूनाचे बालंट आपल्या सर्वांच्या अंगाशी येईल याची सर्वांना भिती वाटू लागली. त्यामुळे जवळच्या नातेवाईकांना बोलावून वडीलांचा झोपेतच मृत्यू झाल्याचा कांगावा करत अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन करण्यात आले. मध्यरात्रीच अंत्यसंस्कार आटोपल्याने व तत्पुर्वी मयत महादेव आणि त्यांचा मुलगा योगेश यांच्यात जोरदार वाद झाल्याचे गावातील काही लोकांना समजले होते. संशयास्पद अंत्यसंस्काराची कुणकुण गावक-यांना लागली होती.
24 ऑग़स्टच्या सकाळी अज्ञात व्यक्तीने या संशयास्पद अंत्यसंस्काराची माहिती पाटोदा पोलिस स्टेशनला कळवली. माहिती मिळताच पाटोदा पोलिस स्टेशनचे पो.नि. मनीष पाटील यांनी आपले सहकारी स.पो.नि. कोळेकर, पो.कॉ. आदिनाथ तांदळे यांच्यासह अंत्यसस्कार झालेल्या जागी भेट दिली. दरम्यानच्या कालावधीत मृतदेह जळून गेलेला होता. पोलिस पथकाने मयत महादेव औटे यांचा मुलगा योगेश (32), लहान मुलगा गणेश (29) व इतर नातेवाकांची चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान महादेव औटे हे घरातच दारु पिल्याने मयत झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. मात्र त्यांच्या चेह-याचा रंग उडाला होता. मयत महादेव औटे यांची मुले काहीतरी लपवत असल्याचे पोलिसांना जाणवले.
मात्र त्यातील काही जण पोलिस चौकशीत बिथरले. त्यांनी पोलिस पथकाला झालेल्या घटनेची माहिती दिली. चुलते विष्णू, वाल्मीक व परमेश्वर औटे यांना या सर्व घडामोडीची माहिती होती. आपल्या परिवारातील लोक तुरुंगात जाऊ नये या हेतून त्यांनी हा प्रकार लपवून ठेवला होता. पोलिस कारवाईच्या भितीने परिवारातील सदस्यांनी रातोरात अंत्यविधी उरकून घेतला होता. पोलिसांना आलेल्या निनावी फोनमुळे हा प्रकार उघड झाला होता. जन्मदात्याच्या खूनाचे बालंट आपल्या अंगी येऊ नये यासाठी हा सर्व खटाटोप करण्यात आला होता. पोलिस उप अधिक्षक विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. मनीष पाटील, स.पो.नि. कोळेकर, पो.कॉ. तांदळे, सानप, कातखडे, तांबे, घुमरे, क्षीरसागर, सोनवणे आदी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दोघा भावांसह तिघे चुलते असे पाच जण अटकेत आहेत.