जळगाव – पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार मोसीन उर्फ दत्ता मन्यार (रा. मास्टर कॉलनी जळगाव ) यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. नशीराबाद पोलिस स्टेशनला दाखल मोबाइल व साडे आठ हजार रुपये रोख रक्कम चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.
नशीराबाद येथील रहिवासी ईमान शरीफ खान या मजुराच्या घरातून लाईट गेल्याचा गैरफायदा घेत मोसीन उर्फ दत्ता मन्यार याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने चोरी केली होती. 30 मे 2021 रोजी रात्रीच्या वेळी ईमान शरीफ यांच्या घरात विज पुरवठा खंडीत झालेला होता. त्यामुळे दार उघडे ठेऊन सर्वजण दारात झोपले होते. या संधीचा फायदा घेत मोसिन मन्यार याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने कपाटातील रोख साडे आठ हजार व पलंगावरील दोन अॅंड्रॉईड मोबाईलची चोरी केली होती. याप्रकरणी नशीराबाद पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबी पथकाकडून सुरु होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी मोसीन उर्फ दत्ता मन्यार व त्याचा साथीदार या दोघांना ताब्यात घेण्याकामी जळगाव शहरातील मास्टर कॉलनी भागात रवाना केले. त्या परिसरातील एका पान टपरीवरुन त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याने नशिराबाद येथील मोबाइल व रोख रकमेच्या चोरीचा गुन्हा कबुल केला. त्याच्या ताब्यातून सदर चोरीतील दोन मोबाईल व रोख दोन हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीच्या रकमेतील उर्वरीत रक्कम त्याने खर्च केली असल्याचे त्याने सांगितले. अटकेतील अट्टल गुन्हेगार मोसीन उर्फ दत्ता मन्यार याच्यावर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे हे.कॉ.विजयसिंग पाटील, हे.कॉ. सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, पो.नाइक नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील, चालक हवालदार राजेंद्र पवार आदींनी तपासकामी सहभाग घेतला.