जळगाव – जामनेर तालुक्यातील लोंढ्री तांडा येथील एका महिलेची पाळधी येथील खासगी रुग्णालयात काही दिवसांपुर्वी प्रसुती झाली होती. प्रसुतीदरम्यान सदर महिलेने स्त्री जातीच्या अर्भकास जन्म दिला होता. अर्भकासह प्रसुत महिलेची तब्येत ठणठणीत असल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.
असे असतांना दोनच दिवसात त्या अर्भकाचा मृत्यू झाला असून नातेवाईकांनी त्याचा अंत्यविधी देखील भल्या पहाटे आटोपला. या संशयास्पद मृत्यूची चौकशी होण्याबाबतचा अर्ज वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी पहुर पोलिसात केला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार अर्भकाला उचकी लागून मृत्यू झाला आहे.