बिड – शेतात शेळ्या चारणा-या अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत केलेल्या शरीरसंबंधातून ती गरोदर झाल्यानंतर तरुणाने तिला विहिरीत ढकलून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. केज तालुक्यात घडलेल्या या घटनेप्रकरणी तरुणावर बलात्कार व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मे ते ऑगस्ट 2021 या महिन्याच्या कालावधीत सदर अल्पवयीन मुलगी शेळ्या चारण्यासाठी शेतात एकटी जात असे. त्यावेळी फुलचंद मुकुंद हाके (रा. माळेवाडी, ता.केज) या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिच्यासोबत अत्याचार केला. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. ती गरोदर असल्याचे त्याला समजताच त्याने तिला विहिरीत ढकलून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने या प्रकारची माहिती तिच्या वडिलांना कथन केली. मुलीच्या फिर्यादीवरून फुलचंद मुकुंद हाके याच्याविरुद्ध केज पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून स.पो.नि. शंकर वाघमोडे व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.