मोलकरणी दरोड्याची सुत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न

अकोट – आकोट शहरात 31 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी स्थानिक व्यापारी अमृतलाल सेजपाल यांच्या निवासस्थानी दरोडा पडला होता. दरोड्याच्या या घटनेनंतर तिन दिवसातच पोलिस पथकाने सहा आरोपींना त्याब्यात घेण्यात यश मिळवले आहे. झटपट पैसे मिळवण्याच्या कमवण्याच्या प्रयत्नात पुर्वी काम करणा-या मोलकरीणने हा दरोड्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी 3 सप्टेबर रोजी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. व्यापारी अमृतलाल सेजवाल यांच्याकडे पुर्वी वैशाली विठ्ठल टवरे ही महिला मोलकरणीचे कामकाज करत होती. कोरोना कालावधीत तिला कामावरुन कमी करण्यात आले असले तरी तिचे सेजवाल कुटूंबियांकडे येणेजाणे कायम होते.

सेजपाल यांचा मुलगा व सुन बाहेरगावी जाणार असल्यामुळे स्वयंपाकासह घरकामासाठी वैशाली टवरे हिला दोन दिवसांसाठी बोलावण्यात आले होते. तिने या कालावधीत घरकाम करत असतांना घरातील सर्व माहीती घेतली. दुस-याच दिवशी 31 ऑगस्ट रोजी तिने तिचा पती विठ्ठल नामदेव टवरे, संगम गणेश ठाकरे, सागर गणेश ठाकरे, अमृता संगम ठाकरे, सीमा विजय निंबोकार व एक विधी संघर्ष बालक या सर्वांच्या मदतीने घरातील सदस्यांना मारहाण करत दोरीने बांधून ठेवत घरातील सामानाचे नुकसान केले. दरम्यान  मुलीने खिडकीतून आरडाओरड केल्यामुळे आलेल्या सर्वांनी एक मोबाईल व 2700 रुपयांवर समाधान मानत पलायन केले.

पोलिस पथकाने शहरातील जवळपास सर्वच सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात काही संशयास्पद व्यक्ती एका ऑटो रिक्षात घाईघाईने बसल्याचे दिसून आले. त्या ऑटो चालकापर्यंत जात पोलिसांनी त्याची विचारपुस केली. ऑटोचालकाने दिलेल्या माहिती व वर्णनानुसार वैशाली टवरे हिस ताब्यात घेण्यात आले. तिने आपला गुन्हा कबुल केल्यानंतर उर्वरित सर्वांना ताब्यात घेण्यात आले. अटकेतील सर्वांना न्यायालयाने 6 सप्टेबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here