जळगाव – शेतक-यांच्या ट्रॅक्टर ट्रॉली चोरणा-या दोघा वाळू व्यावसायीक चोरट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या ट्रॉली हस्तगत करण्यात आल्या आहेत. फैजल खान असलम खान पठाण (21) पिंप्राळा वखारजवळ जळगाव व गोपाल उर्फ विशाल अशोक पाटील (29) रा. खंडेराव नगर पाण्याच्या टाकीजवळ जळगाव असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
सध्या जळगाव जिल्ह्यात शेतक-यांचे ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हा ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीचा प्रकार पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी प्रकर्षाने लक्षात घेतला. अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या सुचनेनुसार एक पथक तपासकामी नेमण्यात आले.
पो.नि.किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांच्या शोध मोहीमेसाठी सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, पोलिस नाईक नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील, परेश महाजन, हरीष परदेशी, भारत पाटील, विजय चौधरी यांचे एक पथक तयार करण्यात आले.
या पथकाने अथक परिश्रम करत चोरीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर वाळूची अवैध वाहतुक करणा-या दोघांच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्या ताब्यातून दोन ट्रॅक्टर ट्रॉली देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. यापैकी एक ट्रॅक्टर ट्रॉली महसुल विभागाने अवैध वाळू वाहतुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतली आहे. ती एक ट्रॉली सध्या जळगाव तालुका पोलिस स्टेशनला जमा करण्यात आली आहे. अशा एकुण तिन ट्रॉलीं चोरीचा गुन्हा निष्पन्न करण्यात आला आहे. महसुल विभागाने यापुर्वी अवैध वाळू वाहतूकीच्या गुन्ह्यात एक ट्रॉली जमा केली असली तरी ती या चोरीच्या निष्पन्न झालेल्या गुन्ह्यात पुन्हा जमा केली जाईल. एमआयडीसी पोलिस स्टेशन येथील एक व धरणगाव पोलिस स्टेशन येथे दाखल असलेले दोन गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत. या कारवाईने ज्या शेतक-यांच्या ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेल्या होत्या त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे मनापासून आभार मानले आहेत. पोळा सणाच्या निमीत्ताने त्यांना जणू काही ही भेट मिळाली आहे.