आपल्या महाराष्ट्रात पावसाळा सुरु होण्यापूर्वीच “मे” महिन्यात शेतकरी कामाला लागतो. सुर्य कितीही आग ओकत असला तरी पेरणी पूर्व मशागत म्हणजे नांगर – वखर – बैलगाडी घेवून शेतकरी – शेतमजूर शेतात असतात. याचवेळी झाडाखाली भाकरी खातांना यंदा पाऊसपाणी चांगल होण्याच्या गप्पा रंगतात.
त्या गप्पा घटकाभर रंगतात त्यानंतर पुन्हा काम सुरु होते. पहिला पाऊस झाल्यावर शेत – पेरणी व लगेच पंढरपुरच्या विठोबा भेटीचे वेध लागतात. हे झाल विधायक काम करणा-यांच जिवनमान.परंतू याच दरम्यान खेड्यापाड्यात गावाच्या पारावर आणि शहरातील हॉटेलांवर रिकामटेकट्यांच्या गप्पांचा फड रंगतो.
कुणाच्या गाडीच चाक मोडल, कुणाचा बैल लंगडा झाला, गावातून कुणाची पोर कुणाच्या पोरासोबत पळून गेली. असल्या वांझोट्या गप्पा रंगतात. अगदीच निरर्थक रिकामटेकडेपणाचे उद्योग म्हणावे, दुसरे काय?
आता राजकारणवाल्यांनी राजस्थानात कॉंग्रेसी पडझडीच्या बातम्या ऐकून महाराष्ट्रातही पडझड होण्याची हुल उठवली. गेल्याच आठवड्यात शिवसेनेच्या संजय राऊत यांनी रा.कॉ. अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मॅरेथॉन मुलाखात घेतली. राजकारणातल्या अनेकांच्या मनातल्या प्रश्नांचा धांडोळा घेतला.
भाजपाला धडा शिकवण्यासाठी रा.कॉ. ने शिवसेना सोबतीला घेवून सत्ता मिळवली. कॉंग्रेसही साथीला होतीच. विरोधात बसून पाच वर्ष सत्तेचा मार खात बसण्यापेक्षा सत्तारूढ बनलेल काय वाईट? या हेतूने कॉंग्रेसने सत्तेची वाट धरली. कुणी कॉंग्रेसवाला जे करु शकत नाही ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरदचंद्र पवार करुन दाखवतात.
मग सत्तेच्या दिंडीत सामील होण्याने स्वाभीमान जपला जात असेल तर काय वाईट म्हणून शिवसेनेने देखील रा.कॉ.च्या सुरात सुर मिसळला. अशा प्रकारे “मिले सुर मेरा तुम्हारा” गाऊन झाल्यावर महाविकास आघाडी सहामाही परिक्षा गुणांच्या टक्केवारी द्वारे वार्षिकीकडे निघाली आहे.
दुसरीकडे सत्तेची शिदोरी गमवल्याने कासाविस झालेल्यांची रोजची आदळआपट सुरु दिसते. चंद्रकांत पाटील यांच्या पासून अनेकांनी जुन्या मित्रांना(शिवसेना) अनेक वेळा साद घातली. माजी मुख्यमंत्री फडणविसांनी रा.कॉ. सोबतच्या दोन दिवसीय सत्तेचा कोळसा उगाळून झाला.
देवेंद्र फडणविसांचे संकटमोचक गिरीश महाजन यांची कथित दिल्लीवारी सांगून झाली. त्यामुळे सत्ताहिन निर्जीव भाजपात प्राण फुंकण्याचे प्रयोग चालू दिसतात. आता सत्तेत नसल्याने भरपूर वेळ मिळालेल्या वाचाळविरांना गप्पा झाडण्याची संधीच मिळालेली दिसते. नाही तरी महाराष्ट्राला राजस्थानचे वावडे नाही.
महाराष्ट्रीयनांच्या लग्न समारंभात राजस्थानी आचारी-वाढपी आता आनंदाने स्विकारले गेलेत. तशीच राजस्थानी कॉंग्रेसी राजकारणात अलीकडेच बसलेले राजकीय बंडखोरीची फोडणी आपणही वापरुन बघू अशा हेतून सरकार पाडण्याच्या गप्पांचा फड लागलेला दिसतो.
तिकडे सचिन पायलट यांचे बंड फसलेले दिसते. भाजपात अजिबात जाणार नाही असेही ते म्हणतात. त्यांना कॉग्रेसमधे राहूनच मुख्यमंत्रीपद हवे होते हे देखील उघड झाले आहे. ते सध्या शक्य नाही. कर्नाटकानंतर लॉकडाऊन काळात मध्यप्रदेशची सत्ता भाजपाने बळकावली. तोच प्रयोग राजस्थान आणि नंतर महाराष्ट्रात करण्याचा दिल्लीचा मनसुबा असू शकतो असे म्हणतात.
त्याच अंदाजाने आता सत्तांतराची मुहुर्त दिवाळी नंतरचा सांगून काही ज्योतीषी त्यांचे दुकान चालवू पाहताहेत. सध्या महाराष्ट्रातील गोरगरीबांना रोजी रोटीची चिंता आहे. कामधंदा करावा, उपाशी मरण्यापेक्षा कोरोनाशी लढून मरु असे लोक म्हणताहेत.
त्यांना कोरोनाच्या भितीपेक्षा आपल्या कुटूंबाच्या दोन वेळच्या भोजनाची चिंता आहे. राजकारणातले बाताडे किंवा वाचीवीर काय बोलतात याच्याशी बहुसंख्यांना काही घेणे देणे नाही. व्यापारी, उद्योजक, कारखानदार, बिल्डर्स, कंत्राटदार, मजूर, मध्यमवर्गीय यांच्यापुढे रोजगार कामधंदे उत्पन असे शेकडो यक्ष प्रश्न आहेत. खर तर राजकारणातल्या कथीत वांझोट्या गप्पा ऐकायला लोकंकडे वेळ तरी कुठे आहे.
सुभाष वाघ (पत्रकार)
8805667750