नवी मुंबई – कोपर खैरणे येथील सारस्वत बँकेत गुरुवारी दुपारी दरोडा पडला होता.या दरोड्याच्या तपासकामी तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
दरोड्याच्या गुन्ह्यात ताब्यातील तिघांचा समावेश असून त्यांची सराईत टोळी असल्याचेही समजते.गुरुवारी दुपारी कोपर खैरणे सेक्टर 19 येथील सारस्वत बँकेवर दरोडापडला होता. बँकेत आलेल्या अज्ञात दोघा लुटारूंनी बँकेतील कर्मचाऱ्यांना चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवला होता.
त्यांनी कर्मचा-यास लॉकररूम उघडण्यास भाग पाडले होते. लॉकर मधील सुमारे साडेचार लाखाची रोकड लुटून ते पसार झाले होते. कोपर खैरणे पोलिस स्टेशनला गुन्हादाखल झाल्यानंतर तपासाला तात्काळ सुरवात झाली होती.तपासात सीसीटीव्हीद्वारे संशयितांची माहिती उघड झाली होती.गुन्हेगारांच्या शोधार्थ वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांनी तपास पथके रवाना केली होती.
सहायक पोलीस निरीक्षक शेख यांच्या पथकाला मुंबईत लपलेल्या संशयितांची माहिती मिळाली होती.त्यानुसार शुक्रवारी रात्रीच पथकाने छापा टाकला. त्यात तिघेजण पोलिसांना गवसले. त्यांचे इतर दोन ते तीन साथीदार अजूनफरार आहेत.
लॉकडाऊन काळात बंदोबस्त असतानाही घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. भरदिवसाबँकेवर दरोडा टाकून गुन्हेगारांनी पोलिसांनाही जणू काही आव्हान दिले होते.बँक परिसराची रेकी करूनच हा दरोडा टाकण्यात आला होता. बँकेतदोघेजण दरोडा टाकत असताना इतर साथीदार बाहेर पहारा देण्याचे काम करत असल्याचे सांगितले जात आहे.