जळगाव– येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत मध्यरात्री चोरट्यांनी बारदान व धान्य विक्रीची 2 दुकाने फोडली. त्यानंतर चोरटयांनी दोन्ही दुकानातील मिळून एक लाख चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम व 25 हजारांचे साहित्य असा 1 लाख 65 हजाराचा ऐवज लांबवला. आज सकाळी ही ल्याची घटना उघडकीस आली.
चोरी केल्यानंतर दोन्ही दुकाने पेटवून देत चोरटे पसार झाले. त्यामुळे दोन्ही दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. नंदलाल जीवनराम राठी यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीत नंदलाल जीवनराम राठी , जीवनराम भगवानदास राठी व महेश नंदलाल राठी , प्रकाश सुभाषचंद्र डोडिया या नावाचे बारदान विक्रीसह धान्य विक्रीची दुकाने आहेत .
सतरा तारखेला सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून राठी घरी परतले. मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप व खिडकी तोडली. चोरी केल्यानंतर चोरटयांनी राठी यांचे दुकान पेटवून दिले.या आगीत बँकेचे चेक बुक्स जमा खर्च’ एलआयसीची कागदपत्रे यासह विविध कागदपत्रे होती.
राठी यांच्या दुकानात धुडगूस घातल्यानंतर चोरट्यांनी पुखराज अर्जुन प्रजापत यांच्या बारदान व धान्य विक्रीच्या दुकानाचा लोखंडी दरवाजा तोडला. दुकानातून 1 लाख 35 हजार रुपये , सीसीटीव्ही कॅमे-याची हार्ड डिस्क, डीव्हीआर, एलसीडी नेट राउटर असे साहित्य लांबवले.
चोरी केल्यानंतर चोरटयांनी हे दुकान देखील पेटवून दिले आगीत या दुकानातील एसी, खुर्ची टेबल फर्निचर असा चाळीस हजार रुपयांचा ऐवज जळाला.राठी यांच्या दुकानासमोरील दुकानदार राजेश प्रजापत यांनी सकाळी दुकान अर्धवट उघडे व दुकानातून धुर निघत असल्याचे पाहिले.
मोबाईलवरून नंदलाल राठी यांना त्यांनी माहिती दिली. राठी यांनी दुकानाकडे धाव घेतली. नंदलाल राठी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरिक्षक विनायक लोकरे यांच्यासह सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मुद्दस्सर काझी, असीम तडवी यांनी घटनास्थळाला भेट देत तपासाला वेग दिला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील करत आहेत.