कोंबड्या चोरी करताना पाहणा-या तरुणाची हत्या

पैठण : पैठण तालुक्यातील शेतशिवारात पंचवीस वर्षाच्या तरुणाची हत्या झाल्याची घटना 11 सप्टेबर रोजी घडली होती. त्या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी दोघा आरोपींना शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. दोघा आरोपींनी हत्येची कबुली दिली असून या खूनाचा उलगडा झाला आहे.

ढोरकीन शिवारातील किरण पेरकर यांच्या शेतात मयत संदीप सूर्यभान साळवे (25), आंबेडकरनगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद हा तरुण गेल्या चार महिन्यांपासून शेतमजूर म्हणून कामाला होता. तो शेतात काम करत असतांना रात्रीच्या वेळी अकरा वाजेच्या सुमारास आरोपी संजय मचांराम चव्हाण व मुकेश ऊर्फ बाळू मंचाराम चव्हाण हे दोघे भाऊ (टाकळी, पैठण शिवार) कोंबड्या व बक-या चोरण्यासाठी त्या शेतात आले.

चोरी करुन परत जात असतांना त्यांना मयताने पाहून घेतले. मयताने दोघांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघा भावांनी त्याला धारदार हत्याराने मारहाण करत जिवे ठार केले. या प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, एलसीबीचे पो.नि. संतोष खेतमाळस यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने आरोपींचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले. दोन बक-या व पंधरा कोंबड्या चोरुन नेत असतांना मयत संदीप साळवे याने त्यांना पाहिले होते व अडवले देखील होते. त्याच्या मुळे आपली चोरी उघडकीस येईल या भितीमुळे पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला ठार करण्यात आल्याचे दोघा आरोपींनी कबुल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here