जालना : विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणा-या सहा वर्षाच्या चिमुकल्याची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. चिमुकल्याची हत्या केल्यानंतर महिलेने मुलगा हरवल्याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. जालना जिल्ह्यातील अंबड येथे सदर घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे.
अंबड तालुक्यातील डावरगाव येथील रहिवासी विवाहिता तिच्या नातेवाईकाच्या उपचारार्थ सहा वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन अंबड येथील दवाखान्यात आली होती. औषधी घेण्याच्या बहाण्याने सदर विवाहीता दुकानावर मुलाला सोबत घेऊन आली. त्याचवेळी संधी साधून तिने आपल्या बाळाला प्रियकराच्या स्वाधीन केले. त्यानंतर मुलगा हरवल्यबाबत अंबड पोलिस स्टेशनला तक्रार देखील दाखल केली.
मुलगा हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा तपास करत असतांना मुलाचा मृतदेह घनसांगवी परिसरातील नाल्याकाठी आढळून आला. मुलगा हरवल्याची तक्रार दाखल करणा-या महिलेवरच पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी तिची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने आपला गुन्हा कबुल केला. आपल्या विवाहबाह्य प्रेमसंबंधात मुलाचा अडसर होत असल्यामुळे प्रियकराच्या मदतीने आपण हा प्रकार केल्याचे तिने कबुल केले. याप्रकरणी प्रियकर नवनाथ जगधने याने मुलाची हत्या केल्याचे उघड झाले. अधिक तपासात शितल उघडे या महिलेसह तिचा प्रियकर नवनाथ जगधने व त्याला मदत करणारा गणेश रोकडे अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.