सोलापूर (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क)– सोलापूर शहरातील रविवार पेठ भागात जय हॉस्पीटल आहे. या हॉस्पीटलमधील रुग्णांवर तथाकथित डॉ. बाळासाहेब नंदुरे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णांवर उपचार केले आहेत. मात्र त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सोलापूरच्या जेलरोड पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपाच्या वैद्यकीय अधिकारी आतिश बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अमेरिकेतील रहिवासी डॉ. श्रीनिवास पिंडीपोल यांनी सोलापुर शहरात हा दवाखाना सुरु केला आहे. महाराष्ट्र शुश्रुषाग्रह नोंदणी अधिनियम 1949 चे कलम 5 नुसार या दवाखान्याची सोलापूर मनपात नोंदणी करण्यात आली आहे. या नोंदणीत डॉ. मनोज कोरे, डॉ. सुमित सुरवसे, डॉ. चंद्रशेखर बिराजदार, डॉ. प्राजक्ता घोसेकर, डॉ. दयानंद चिटकुल, परमानंद गोणसगी आदींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या माहितीच्या व तपासणीच्या आधारे मनपाने 9 एप्रिल 2021 रोजी या दवाखान्याला प्रमाणपत्र दिले आहे. एप्रिल 2020 मधे या रुग्णालयात आढळून आलेल्या कोरोना रुग्णाची माहीती मनपाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे या दवाखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर हा दवाखाना काही महिने बंद होता.
या दवाखान्यात बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याची तक्रार 14 सप्टेबर रोजी रुपेश भोसले यांनी केली. या तक्रारीच्या आधारे आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज तेली यांच्यासह त्यांच्या पथकाने दवाखान्यात भेट दिली. या दवाखान्यात डॉ. बाळासाहेब नंदुरे हे रुग्णांची तपासणी व उपचार करत असल्याचे पथकाला व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले. रुग्णालयात दाखल रुग्णांचे केसपेपर तपासले असता त्यावर बाळासाहेब नंदुरे यांच्या नावाचा व सहीचा उल्लेख आढळून आला. वैद्यकीय पथकाने त्यांच्याकडे पदवी प्रमाणपत्रांसह इतर कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे आणून देतो असे म्हणत बाहेर गेलेले नंदुरे फरार झाले. हा दवाखाना चालवणारे अमेरिका स्थित कृष्णमुर्ती पिंडीपोल यांच्यासह पदवी नसतांना रुग्णांवर उपचार करणा-या बाळासाहेब नंदुरे या दोघांवर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.