अमरावती : धामणगव रेल्वे तालुक्यात असलेल्या निंभोरा बोडखा येथील तरुणाचा गेल्या तीन वर्षांपूर्वी भाल्याने खून करण्यात आला होता. या प्रकरणी दोषी आढळून आलेल्या आरोपीस अमरावती जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक 3) निखिल मेहता यांच्या न्यायालयाने जन्मठेपेसह दहा हजार रुपये दंड अशा स्वरुपाची शिक्षा ठोठावली आहे. सुनील अंबादास गवारले (42), रा. निंभोरा बोडखा, ता. धामणगाव रेल्वे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे आणि कैलास नामदेव पांडे (रा. निंभोरा बोडखा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
4 जुलै 2018 रोजी निंभोरा बोडखा या गावी सायंकाळी सहा वाजता छबुताई पांडे यांना त्यांचा मुलगा कैलास याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी घराबाहेर जावून पाहिले असता, कैलास रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. त्याचवेळी तेथून सुनिल गवारले हा भाल्यासह बाहेर येताना दिसला. त्याने भाल्याचा पाता कपड्याला पुसून छबुताई यांच्याकडे डोळे वटारुन बघत तेथून दुचाकीने पसार झाला. जखमी कैलास यास दवाखान्यात नेत असतांना वाटेच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कैलासची आई छबुताई पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मयत कैलास याने आरोपी सुनिल गवरालेच्या भावाला स्थावर मालमत्तेसंबंधात व त्याच्या अधिकाराबाबत जागृत केले होते. तो राग मनात धरुन आरोपी सुनिल गवारले याने कैलासचा भाल्याच्या पात्याने भोसकून खून केल्याची तक्रार त्यावेळी नोंद करण्यात आली होती. मंगरुळ दस्तगीर पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विवेकानंद राऊत यांनी पथकासह घटनास्थळाला भेट दिली होती. तत्कालीन स.पो.नि. राऊत यांनी 30 सप्टेंबर 2018 रोजी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षाकडून एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्ष साक्षीदारास फितूर घोषित करण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने तपासण्यात आलेल्या साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरत आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरण्यात आले. न्यायालयाने सुनावण्यात आलेल्या दंडाच्या दहा हजार रुपयांपैकी नऊ हजार रुपये तक्रारदार छबुताई पांडे यांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. दिलीप तिवारी यांनी याप्रकरणी युक्तिवाद केला.