महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे दोघे अटकेत

जळगाव – महिलांना पत्ता विचारण्याचा बहाणा करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरुन नेणा-या दोघा आरोपींना जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली.

संदिप रोहिदास सोनवणे (नाशिक) व सतीष गोविंद चौधरी (मालेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. दोघा आरोपींनी जळगाव शहरातील रामानंद नगर व जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीतून प्रत्येकी चार असे एकुण आठ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.

गेल्या सुमारे नऊ महिन्यातील एकुण आठ गुन्हे दोघा आरोपींच्या अटकेनंतर उघडकीस आले आहेत. महिलांच्या गळ्यातील साखळी चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असतांना तपासकाम देखील त्याच वेगाने सुरु होते. 13 ऑगस्ट रोजी जिल्हापेठ हद्दीत सोनसाखळी चोरीची घटना घडल्यानंतर लागलीच दुस-या दिवशी औरंगाबाद शहरात देखील तशीच घटना घडली होती. आरोपी औरंगाबादच्या दिशेने गेले असावेत असा अंदाज लावण्यात आला होता.

दरम्यान जिल्हापेठ पोलिसांचे एक पथक चार दिवस नाशिक शहरात तपासकामी मुक्कामी होते. तेथील तपासात दोन आरोपी पथकाला गवसले. संदीप सोनवणे हा नाशीक शहरातील असून दुसरा सतीश चौधरी हा मालेगाव येथील रहिवासी आहे. या आरोपींच्या माध्यमातून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दोघा आरोपींकडून चोरीस गेलेला सोनसाखळीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रीया सुरु आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस नाईक सलीम तडवी, रविंद्र साबळे, विकास पहुरकर, समाधान पाटील यांनी सहभाग घेतला. पत्रकार परिषदेला पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे व पो.नि. रामदास वाकोडे तसेच त्यांचे सहकारी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here