मुंबई: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी काही तरुण उत्तर प्रदेशातून मुंबईत दाखल झाले. मुंबईत आलेल्या तरुणांवर तीन मद्यपींनी हल्ला केला. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबाबत अंधेरी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तो आता जुहू पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.
तथापी दारू पिण्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचा दावा तक्रारदार करत आहे.याप्रकरणी जुहू पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. भाईंदर येथे राहणाऱ्या संजय गोपी खारवा उर्फ राजेंद्र उर्फ खिडकी, माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या सुरेश कानजी खारवा या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
यातील तक्रारदार अकील रफिक अहमद हा मूळचा उत्तरप्रदेश- बरेलीतील ताईपुरी पोलिस चौकी हद्दीत राहतो. तो स्वतः ला अमिताभ बच्चन, अक्षय कुमार या अभिनेत्यांचा चाहता असल्याचा दावा करतो. ३० जून रोजी तो घरातून पळून आला होता. मुंबईत आल्यापासून दररोज अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर झोपत असल्याचे तो पोलिसांना सांगतो.
४ जुलैच्या रात्री अकील हा भारती आरोग्य निधी रुग्णालयाच्या बाहेर फुटपाथवर झोपला असतांना तेथे आरोपी आले. अकील यास एकटा पाहून त्यांनी त्याला दारू पिण्यासाठी आग्रह केला. अकिलने विरोध केला. त्यानंतर अकिल आणि आरोपींमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली.
त्यानंतर तिघा आरोपींनी अकीलवर चाकू हल्ला केला. या हल्यात अकिलच्या पोटावर,छातीवर आणि उजव्या हाताच्या दंडावर वार झाले. त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर कूपर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंधेरी पोलिस घटनास्थळी आले. अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी त्यांनी हा गुन्हा जुहू पोलिसांकडे वर्ग केला. दोघांना हल्लेखोरांना अटक करण्यात आली.