जळगाव – हरिविठ्ठल नगर भागातील महिला आपल्या परिवारासह एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील राम नगर भागात भंडारा कार्यक्रमात गेली होती. 17 सप्टेबरच्या रात्री वाद्य आणि दांडीयाच्या तालावर नृत्य सुरु असतांना सदर महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटात वाद झाल्याने परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूच्या तक्रारदारांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिस पथकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील महिलेचे नातेवाईक रामेश्वर कॉलनी परिसरातील राम नगर भागात राहतात. त्याठिकाणी गणपतीची स्थापना झाली असून भंडारा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात नातेवाईकांच्या निमंत्रणावरुन सदर महिला तिची आई, भाऊ आणि मुलगा अशांसह आलेली होती. रात्रीच्या वेळी या मंडळाच्या प्रांगणात दांडीया नृत्य सुरु होते. दरम्यान एकाने येत या महिलेला स्पर्श करत तिचा विनयभंग केला. या प्रसंगाला अनुसरुन महिलेने आरडाओरड केली. दरम्यान गोंधळ उडाल्याने तणाव निर्माण होत हाणामारीचा प्रकार घडला. वैद्यकीय उपचारानंतर सदर महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिस स्टेशनला आठ जणांविरुद्ध रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान विनयभंग करणा-या तरुणाच्या गटातील महिलेने परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार रात्र बरीच झाल्याने सुरु असलेला स्पिकर बंद केल्याच्या कारणावरुन वाद घालत मारहाण, शिवीगाळ व चाकूने दुखापत करणे अशा विविध आरोपाखाली अकरा जणांविरुद्ध रितसर गुन्हा नोंद केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स.पो.नि. अमोल मोरे, चेतन सोनवणे, सचिन पाटील, योगेश बारी व साईनाथ मुंडे आदींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते.