वाईन शॉप मॅनेजरला लुटणारे चौघे अटक

अहमदनगर – वाईन शॉप मॅनेजरच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून त्याच्या ताब्यातील लाखो रुपयांची बॅग जबरीने चोरुन नेणा-या चौघांना नगर एलसीबी पथकाने अटक केली आहे. 10 लाख 70 हजार रुपये असलेली बॅग चोरण्याकामी दुकानातील नोकराचा समावेश असल्याचे तपासात उघड झाले आहे. लखन नामदेव वैरागर (29) रा.सेंट मेरी चर्चच्या मागे नागापूर असे त्या नोकराचे नाव असून त्याच्यासह चौघे अटक करण्यात आले आहेत. इतर दोघे फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

मनमाड रस्त्यावरील प्रकाश वाईन्सचे मॅनेजर आशीर बशीर शेख (रा. सावेडी) हे दुकानाचे कामकाज आटोपून रात्री जमा रकमेच्या बॅगसह घरी निघाले होते. दरम्यान रस्त्यात विना क्रमांकाच्या मोटार सायकलने काही तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकून त्यांच्या ताब्यातील 10 लाख 70 हजार रुपयांची बॅग जबरीने हिसकावून नेली. याप्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी या गुन्ह्याच्या तपासकामी विविध पथके तयार केली. सपोनि सोमनाथ दिवटे, पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, पोलिस नाईक रवी सोनटक्के, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, संदीप चव्हाण, भरत बुधवंत, पोलिस कॉन्स्टेबल योगेश सातपुते, सागर ससाणे, कमलेश पाथरुट आदींचा या पथकात समावेश करण्यात आला. तपासाअंती दुकानात काम करणारा नोकर लखन वैरागर यास ताब्यात घेतले असता त्याने साथीदारांच्या मदतीने या गुन्ह्याची कबुली दिली.

त्याच्यासह प्रमोद बालू वाघमारे (23), रा. अण्णा भाऊ साठे समाज मंदीर शेजारी, नागापूर, विशाल भाऊसाहेब वैरागर (25), रस्तापूर, ता. नेवासे, दिपक राजू वाघमारे (20), सेंट मेरी चर्च पाठीमागे, नागापूर यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. इतर फरार दोघा साथीदारांचा शोध सुरु आहे. 5 लाख 20 हजार रोख, तीन मोटारसायकल व चार मोबाईल असा 9 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here