क्लासला गेलेली परी आलीच नाही घरी नराधम बापाने पाठवले होते तिला देवाघरी

जळगाव : संदिप आणि नयना यांचा  विवाह सुमारे आठ वर्षापुर्वी मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नाचे वेळी नयनाच्या  आई वडीलांनी तिला मोठ्या प्रमाणात दागिने करुन दिले होते. प्रत्येक विवाहीत स्त्रीला दागीन्यांची भारी हौस असते. तशी नयनाला देखील दागिन्यांची मोठी हौस होती. लेकीची हौस पुर्ण करण्यासाठी पदरमोड करुन नयनाच्या आईवडीलांनी तिला लग्नात चांगले दागीने करुन दिले होते. ते दागीने नयनासाठी एक अनमोल ठेवा होता. पतीप्रमाणेच तिचा त्या दागीन्यात देखील मोठा जिव होता. प्रत्येक स्त्रीला तिचे मणी – मंगळसुत्र प्रिय असते.
लग्नानंतर संदिप व नयनाचे सुरुवातीचे दिवस मजेत गेले. दोघांच्या संसार वेलीवर वर्षभरात एक कन्यारत्न आले. त्यांनी तिचे नाव कोमल असे ठेवले. कोमल दिसायला खरोखर एखाद्या परीसारखी होती. त्यामुळे त्यांनी तिचे टोपणनाव परी असे ठेवले होते. नयनाचा परीमधे खुप जिव होता. परी म्हणजे नयनाच्या जिवाचा तुकडा होता. ती मुलगी, परीची खुप काळजी घेत असे.
संदिपला दारु पिण्याचे व्यसन होते. त्याचे दारुचे व्यसन नयनाला लग्नानंतर समजले. त्यामुळे ती व्यथित झाली होती. परंतु वाद न घालता सुरुवातीला तिने संदिप यास प्रेमाने समजावून सांगत दारुपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्याचे दारु पिण्याचे व्यसन कसे सुटेल यासाठी ती प्रयत्नशील होती. त्याच्या दारु पिण्यावर निर्बंध घालण्यासाठी तिने मनापासून प्रयत्न चालवले होते.
लग्नानंतर काही वर्षांनी संदिप व नयना जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील हिरागौरी पार्क येथे राहण्यास आले. बघता बघता त्यांची मुलगी कोमल उर्फ परी सात वर्षाची झाली. परीचे शिक्षण उच्च प्रतिचे व्हावे असे नयनाला वाटत होते. त्यासाठी तिने परीला वर्ल्ड इंग्लिश मिडीयम स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केजीच्या वर्गात टाकले.
अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथील मुळ रहिवासी असलेल्या संदिपला पुणे शहरात व्यवसाय करण्याची हौस  होती. परंतू त्याच्याजवळ व्यवसायासाठी भाग भांडवल नव्हते. काहीही करुन पुणे येथे व्यवसाय करण्याचे खुळ त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. व्यवसायासाठी भाग भांडवल जमा करण्यासाठी त्याच्या मनात पत्नी नयनाचे दागिने मोडण्याचा विचार चमकून गेला. त्यासाठी त्याने नयनाजवळ तगादा लावला.
आपले दागिने मोडण्यास नयना अजिबात तयार झाली नाही. परंतू त्याने व्यवसाय करण्यासाठी नयनाजवळ हेकाच लावला. त्यामुळे दोघा पती पत्नीत दागिन्याच्या विषयावरुन वाद विवाद होवू लागले. अखेर तिने आपल्या वडीलांचा सल्ला घेतला. तिच्या वडीलांनी देखील जावई संदिप यास समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू पुणे शहरात व्यवसाय करण्याचे खुळ संदिपच्या मनातून काही केल्या जात नव्हते. अखेर त्याने नयनाचे दागिने मोडून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला लवकरच अपयश आले. त्यामुळे हातचे दागीने गेले आणि हात चोळत बसण्याची वेळ संदिपवर आली.
मी तुला तुझे दागिने पुन्हा तयार करुन देईन असे सांगून संदिपने नयनाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नयनाचे तात्पुरते समाधान झाले. परंतू संदिपला ते शक्य होत नव्हते. दिवसामागून दिवस जात होते. त्यांची मुलगी, परी दिवसेंदिवस मोठी होत होती. तिच्या शिक्षणाला पैसे लागत होते. घरखर्च दिवसेंदिवस वाढतच होता.
अखेर संदिप तिनशे रुपये रोजंदारीने वेल्डींगच्या दुकानावर कामाला जावू लागला. त्यातच तो नैराश्यात गेला. त्यामुळे पुन्हा त्याचे दारु पिण्याचे व्यसन जागे झाले. त्याला नेहमी दारु पिल्याशिवाय जमतच नव्हते. त्याच्या दारू पिण्यामुळे भरल्या घरात वाद होवू लागले. आपल्या आई वडीलांचा दारु आणि दागीन्यांवरुन होणारा वाद बिचारी सात वर्षाची परी उघड्या डोळ्यांनी हतबल होवून बघत असे. आईवडीलांचा नेहमीचा वाद बघून व ऐकून तिच्या कोमल मनावर  परिणाम होत असे.
आता संदिपने दारु पिण्यासाठी एक नविन शक्कल लढवली. तो घरी येतांना खिशातच दारुची बाटली आणू लागला. घरी आल्यावर तो गुपचुप बाथरुम मधे जावून दारु पिण्याचा कार्यक्रम करु लागला. त्याचा हा प्रकार काही दिवस बिनदिक्कत खपून गेला. मात्र एके दिवशी त्याचा हा लपुनछपून दारु पिण्याचा प्रकार परीने पाहून घेतला. त्यामुळे  तिने हा प्रकार लागलीच तिची आई नयनाला सांगितला.
नयनाला हा प्रकार समजताच पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले. तो बाथरुम मधे गेला म्हणजे नयनाला शंका येवू लागली. बाथरुम मधे जावून आपला लपुनछपून दारु पिण्याचा प्रकार बालिका परीमुळे उघडकीस आला होता. त्यामुळे आता त्याला परीवर देखील राग येत होता.
त्याचे सासरे देखील त्याला नयनाचे दागिने लवकरात लवकर करुन देण्याचे सांगत होते. त्यामुळे तो तणावात आला होता. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार अधुनमधून येत होते. त्यातच त्याल्या गोंडस व निष्पाप बालिका कोमल उर्फ परीवर देखील राग येत होता.
परी सकाळी सात ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान शाळेत जात होती. त्यानंतर दुपारी चार ते पाच या वेळेत जवळच असलेल्या मॅडमच्या घरी ट्युशनला जात होती. तिचा हा दिनक्रम संदिप यास चांगल्या प्रकारे माहीत होता.
8 जानेवारी रोजी सकाळी साडे आठ वाजता संदिप नेहमीप्रमाणे वेल्डींच्या दुकानात कामाला गेला. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तो दुकान मालकांना भेटला. गावात बाजार करायला जायचे कारण सांगून त्याने कामावरुन सुटका करुन घेतली. दुकान मालकाने होकार देताच तो पायी पायी चालत गुजराल पेट्रोल पंपाजवळ एका दारुच्या दुकानावर गेला. तेथे त्याने एक देशी दारुची बाटली विकत घेतली. तेथून तो पुन्हा खोटे नगर बस स्टॉप कडे चालत आला. त्यावेळी कोमल उर्फ परी ही ट्युशनला गेली असल्याचे त्याला माहित होते. आज परीला जिवानिशी ठार करण्याचा बेत त्याने मनाशी आखला होता. आज आपला जन्मदाता बाप आपला काळ बनून येणार आहे हे त्या निष्पाप बालिकेला माहीत नव्हते. आज आपल्या ट्युशनचा नव्हे तर जिवनाचा अखेरचा दिवस आहे हे देखील त्या निरागस बालीकेला कसे कळणार होते?
तो तसाच तिच्या ट्युशनच्या मॅडमकडे गेला. कोमलला आज लवकर सोडा. मी आज तिला माझ्यासोबत गावात घेवून जाणार आहे असे त्याने ट्युशनच्या मॅडमांना खोटेच सांगितले. परीचे वडील स्वत: तिला घेण्यासाठी आले असल्याचे बघून ट्युशनच्या मॅडमांनी तिला संदिपसोबत जावू दिले. परीचे दप्तर त्याने तसेच तिच्या क्लासमधे ठेवून तो तिला घेवून बाहेर आला.
परीला सोबत घेवून तो आधी एका किराणा दुकानावर गेला. परीसाठी त्याने चॉकलेट, कुरकुरेचे पाकीट, पाण्याची बाटली व स्वत:ला दारु पिण्यासाठी प्लास्टीकचा ग्लास असे साहित्य विकत घेतले. निरागस परीला सोबत घेवून तो पुन्हा महामाग्रावर खोटे नगर बस स्टॉप जवळ आला. निरागस परी आपले वडील सोबत असल्याने निश्चिंत होती. मात्र बापाच्या मनात काय सुरु आहे हे तिला माहित नव्हते. सायंकाळ झपाट्याने होण्यास सुरुवात झाली होती. त्याने हात दाखवून बांभोरी गावाच्या दिशेने जाणारी एक रिक्षा थांबवली. रिक्षा थांबताच तो बांभोरी कडे जाण्यासाठी परीला सोबत घेवून बसला. महामार्गावरील बांभोरी गावाजवळ असलेला पुल संपताच तो रिक्षातून परीला सोबत घेवून खाली उतरला.
परीला घेवून तो पायी पायी पुलाच्या खाली गिरणा नदीच्या पात्रात गेला. आता सायंकाळ झाल्याने अंधार पडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे परीला घरी लवकर जाण्याचे वेध लागले होते. तिला तिच्या आईची आठवण येत होती. नदीच्या पात्रात तो थोडावेळ बसला. परीला आईची आठवण येत असल्याने तिने संदिप यास विचारले की पप्पा तुम्ही मला येथे का आणले? मला आता घरी जायचे आहे. त्यावर संदिप तिला म्हणाला की आपण येथे सहज फिरण्यासाठी आलो आहोत. काही वेळाने परीला पुन्हा तिच्या आईची आठवण येवू लागली. तिने पुन्हा एक वेळ संदिप यास म्हटले की पप्पा अंधार पडत आहे. मला येथे भिती वाटते तुम्ही मला घरी आईजवळ घेवून चला. ती अस्वस्थ झाल्याचे बघून तो तिला घेवून पुलाच्या पिलर जवळ आला. पिलर जवळ असलेल्या वाळू पात्रात त्याने परीला बसवले. तिच्या पाठमो-या भागाकडे जावून त्याने हळूच ग्लासात पाणी ओतून दारुचा घोट घेतला. त्यानंतर त्याच्या मनात निरागस परीबद्दल राग उफाळून आला. आपण लपूनछपून बाथरुम मधे दारु पित असतांना ती आपले नाव आईला सांगते व त्यातून वाद निर्माण होत असल्यामुळे त्याचा निरागस चिमुरडया परीवर राग होता.
सतापाच्या भरात त्याने परीचा पाठमो-या अवस्थेत गळा दाबून धरला. त्यानंतर त्याने तिला जमीनीवर झोपवले. बापाच्या अशा कृत्याने ती प्रचंड घाबरली. आजुबाजुला सर्वत्र अंधार असतांना तिला जमिनीवर झोपवून संदिप तिचा गळा दाबत होता. बापाच्या ताकदीपुढे सात वर्षाच्या चिमुरड्या परीची प्रतिकारशक्ती तरी काय असणार? तिने काही वेळातच आपला जिव सोडला. परीच्या जिवाची हालचाल बंद होताच संदिप हादरला. त्याने घाम पुसत सोबत असलेल्या बाटलीतील पाणी घटाघटा पिले. मृतावस्थेतील परीसह पाण्याची अर्धवट भरलेली बाटली व ग्लास जागेवरच टाकून त्याने तेथून काढता पाय घेतला. झपाझप पावले टाकत त्याने पुन्हा महामार्गावर आगमन केले. त्यावेळी रात्रीचा अंधार पसरला होता. त्याचवेळी धुळे शहराकडे जाणारी बस त्या ठिकाणी स्टॉपवर आली. बस थांबताच तो धुळे येथे जाण्यासाठी बसमधे चढला. रात्री अकरा वाजेच्या सुमारास तो धुळे बस स्थानकावर पोहोचला. रात्रभर तो धुळे बस स्थानकावर झोपून राहीला.
या कालावधीत घरी नयनाच्या मनाची घालमेल वाढली होती. पती संदिप आणि चिमुरडी परी घरी परत आली नाही म्हणून तीचे मन अस्वस्थ आणि सैरभैर झाले होते. तिने संदिप यास त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद येत होता. आपली चिमुरडी परी आता कुठे असेल व काय करत असेल या विचारानेच ती हवालदिल झाली होती. तिने तिच्या क्लासच्या मॅडमसोबत संपर्क साधला असता परी दुपारीच तिच्या वडीलांसोबत बाहेर गेली असल्याची माहिती तिला मिळाली. संदिप जात असलेल्या दुकान मालकासोबत संपर्क साधला असता तो दुपारीच दुकानातून गावात गेला असल्याची माहीती तिला समजली. नातेवाईकांशी तिने संपर्क साधला असता कुठेही त्याचा तपास लागला नाही. रात्र झाली तरी कुणी घरी येत नसल्याचे बघून नयना घाबरली. तिने देव्हा-यातील देव पाण्यात टाकले. सकाळ होताच तिने जळगाव तालुका पोलिस स्टेशन गाठत पोलिस निरिक्षक रविकांत सोनवणे  यांची भेट घेत हकीकत कथन केली. परी हरवल्याबाबत तिने मिसिंग दाखल केली.
दुस-या दिवशी 9 जानेवारी रोजी सकाळी संदीप झोपेतून उठला. धुळे बस स्थानकावर त्यावेळी सात वाजता जळगावला जाणारी बस उभी होती. तो त्या बसमधे चढला. मनाशी काहीतरी विचार करत तो वाटेत पारोळा बस स्थानकावर उतरला. त्याच्या नजरेसमोर परीचा मृतदेह फिरत होता. आता आपण देखील आत्महत्या करुन आपली जिवनयात्रा संपवावी असा विचार करत त्याने पारोळा शहरातील आयटीआय गाठले.
त्यावेळी त्याने तो कामावर जात असलेल्या दुकानमालकाशी संपर्क साधत घटनाक्रम कथन केला. संदिपने त्याच्या निरागस मुलीला काल रात्री मारुन टाकल्याचे समजताच तो कामावर जात असलेला दुकान मालक काही वेळ हादरला. त्याने संदिपला विचारले की आता तु कुठे आहेस? त्यावर पलिकडून संदिपने  सांगितले की मी आता पारोळा शहरातील आयटीआय जवळ आहे. त्याने दिलेली माहीती मिळताच वेल्डींग वर्कशॉप दुकानदाराने लागलीच जळगाव तालुका पोलिस स्टेशन गाठले. पोलिस निरिक्षक रविकांत सोनवणे यांची भेट घेवून त्यांना दुकान मालकाने सर्व हकीकत कथन केली. त्याअगोदर संदिपची पत्नी नयनाने परी हरवल्याबाबत मिसिंग दाखल केलेली होती. मिसिंगमधील चिमुरडया परीचा खून झाला असल्याचे समजताच पोलिस निरिक्षक रविकांत सोनवणे यांनी सर्वप्रथम आपल्या सहका-यांना सोबत घेत गिरणा नदीच्या पुलाखाली असलेले घटनास्थळ गाठले.
घटनास्थळावर निरागस कोमल उर्फ परीचा मृतदेह पडलेला होता. तिच्याजवळच पाण्याची अर्धी रिकामी बाटली, ग्लास व इतर वस्तू पडलेल्या होत्या. या गंभीर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बापू रोहोम  आपआपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. कर्मचारी वर्गाच्या मदतीने घट्नास्थळावरील मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. फॉरेंन्सिक पथकाने घटनास्थळावरील माती व रक्ताचे नमुने तसेच इतर वस्तू तपासकामी ताब्यात घेतल्या. परीचा मृतदेह सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला.
त्याचवेळी पारोळा पोलिसांना निरोप देत त्यांच्या मदतीने तेथील आयटीआय जवळ असलेल्या संदिप यास ताब्यात घेण्यात आले. त्याला जळगाव येथे आणले गेले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मरण पावलेल्या कोमल उर्फ परीची आई नयना सामान्य रुग्णालयात दाखल झाली. आपल्या लाडक्या व चिमुरड्या परीचा मृतदेह बघून काहीवेळ तिच्या कंठातून आवाज निघेनासा झाला. काही वेळाने तिने एक जोरदार हंबरडा फोडला. तिचा मन हेलावणारा आक्रोश बघून उपस्थितांचे  मन गहिवरुन आले. मला आई म्हणणारी परी उठ आता ……आता मला आई कोण म्हणेल.माझी परी ……असे  म्हणत नयना आक्रोश करु लागली.
परीचा मृतदेह ताब्यात घेतांना कागदपत्रांवर थरथरत्या हातांनी सही करतांना नयनाचे रडणे थांबत नव्हते. अतिशय शोकाकुल वातावरणात परीवर अंतिम संस्कार करण्यात आले. परीच्या खूनप्रकरणी नयना चौधरीच्या फिर्यादीनुसार जळगाव तालुका पोलिस स्टेशनला पती संदिप यादव चौधरी याच्याविरुद्ध परीच्या खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यातील संदीप यास रितसर अटक करण्यात आली.
संदीप यास न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबुल केला. घरगुती वादातून आपण चिमुरड्या बालिकेचा खून केला असल्याचे त्याने कबुल केले. या गुन्ह्याच्या पुढील तपास पोलिस निरिक्षक रविकांत सोनवणे यांच्यासह त्यांचे सहकरी सहायक पोलिस निरिक्षक गणेश चव्हाण, हेड कॉन्सटेबल वासुदेव मराठे व पोलिस नाईक चेतन पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here