जळगाव – मागणीच्या पाचपट रक्कम निघत असल्याचे समजताच एटीएम सेंटरवर झुंबड उडाल्याची घटना जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील चिनावल या गावी घडली. दोन तासात सुमारे सहा लाख रुपयांची रोकड या एटीएम मधून निघाल्याचे म्हटले जात आहे.
जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यात चिनावल या गावी 21 सप्टेबरच्या रात्री हा प्रकार घडला. या गावी बस स्थानकावर टाटा इंडीकॅश एटीएम मशीन लावण्यात आले आहे. हव्या असलेल्या रकमेपेक्षा पाचपट रक्कम मशीन मधून बाहेर येताच सुरुवातीला ग्राहकाचा विश्वास बसला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा काही रकमेची मागणी केली असता त्याला पुन्हा पाचपट रक्कम हाती लागली. त्यानंतर या घटनेची माहिती चिनावल गावात वा-यासारखी पसरली.
बघता बघता या एटीएम मशीनवर गर्दी उसळण्यास वेळ लागला नाही. प्रत्येक जण या एटीएमवर गर्दी करु लागला. बघता बघता जवळपास सहा लाख रुपयांची रोकड ग्राहकांनी काढून घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलिसांना हा प्रकार समजताच याठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला व गर्दी पांगवण्यात आली. रक्कम भरतांना ब्लॉक सेटींग चुकली असावी अथवा मशीनच्या सेटींगमधे बिघाड झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.