जळगाव – गुन्हेगारांकडे एक हत्यार असते तर आमच्याकडे अनेक हत्यार असतात असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर यांनी आज जळगाव येथे माध्यमांसोबत बोलतांना म्हटले आहे. जळगाव शहरात झालेली गोळीबाराची घटना तसेच नशिराबाद येथे झालेला खुनाचा प्रकार या पार्श्वभुमीवर डॉ. शेखर जळगावला आले आहेत. जळगाव पोलिस अधिक्षक कार्यालयात माध्यमांसोबत संवाद साधत त्यांनी वार्तालाप केला.
फायर आर्म्स, अवैध सावकारी आणी महिला अत्याचार या प्रमुख मुद्द्यांवर विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर यांनी चर्चा केली. गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना म्हटले. जास्तीत जास्त फायर आर्म्स कसे ताब्यात घेतले जातील यावर आमचा भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना म्हटले. अग्नीशस्त्रांच्या कारवायांचे परिणाम लवकरच दृश्य स्वरुपात दिसतील असे देखील त्यांनी म्हटले. गेल्या पाच वर्षातील आरोपींचा डाटा संकलीत करण्याचे काम सुरु आहे. एमपीडीए व मोका तसेच प्रतिबंधक कारवाया सुरु आहेत. गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण होण्याच्या दृष्टीने कामकाज केले जाणार असून याप्रकरणी संपुर्ण रिझल्ट मिळेपर्यंत कारवाया सुरुच राहणार आहेत.
अवैध सावकारीचे या विषयाला डॉ. शेखर यांनी हात घालत चर्चा यावेळी केली. खासगी सावकारीत सर्वसामान्य लोकांसह शेतकरी अडकतो. खासगी सावकार व्याजाच्या रकमेत मालमत्ता हडप करतात. कुणाला काही माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी. त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिस बांधील आहेत. महिला अत्याचार, छेडछाड प्रकरणी गुन्हेगारांचा डाटा संकलीत करण्याचे काम सुरु आहे. गुन्हेगारांकडे एक हत्यार असते मात्र आमच्याकडे अनेक हत्यार असतात. त्यामुळे निर्धास्तपणे गुन्हेगारीची कुणाला माहिती असल्यास ती देण्याचे आवाहन यावेळी डॉ. शेखर यांनी केले. अनेक जण भितीपोटी पोलिसांना माहिती देत नाही. माहिती देण्यासाठी लोक पुढे आल्यास कडक कारवाई करता येईल. या पत्रकार परिषदेच्या वेळी पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता आदी उपस्थित होते.