वाहनधारकांवर हल्ला व लुट करणारे नगर एलसीबीने केले जेरबंद

अहमदनगर : रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी टेम्पोत झोपलेल्या दोघा वाहनचालकांवर सशस्त्र हल्ला करत त्यांची लुट करणा-या तिघांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अहमदनगर – मनमाड मार्गावरील येसगांव फाट्यानजीक राजस्थान ढाब्यासमोर 19 सप्टेबर रोजी सदर घटना घडली होती.

उंकार उर्फ अजून शंकरलाल मेवाडा (पिरझलीर, ता. बडनगर, जि. उज्जैन, मध्यप्रदेश) व गोकूळसिंग रजपूत हे दोघे टेम्पो चालक आहेत. 19 सप्टेबर रोजी दोघा चालक मित्रांनी आपल्या ताब्यातील दोन्ही टेम्पो नगर – मनमाड महामार्गावरील येसगांव फाटा येथील राजस्थान ढाब्यासमोर उभे केले होते. रात्री दोघे चालक मित्र टेम्पोत झोपलेले असतांना करुन अज्ञात चोरटे तेथे आले. त्यातील एका चोरट्याने त्यांच्या टेम्पोच्या कॅबीनचा दरवाजा उघडून उंकार मेवाडा यांच्या पॅंटच्या खिशात हात घातला. यावेळी उंकार मेवाडा यांना जाग आली. त्यांनी लागलीच चोरट्याचा हात पकडून आरडाओरड सुरु केली.

यावेळी उंकार मेवाड यांच्या हातावर, दंडावर, मनगटावर, पायावर कमरेवर चोरट्याने चाकूने वार केले. मित्राचा बचाव करण्यासाठी गोकूळसिंग रजपूत हे मधे पडले. चोरट्यांनी गोकुळसिंग रजपूत यांच्या पोटावर चाकूने वार करत त्यांना जखमी केले. दरम्यान उंकार मेवाड यांच्या ताब्यातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हल्लेखोर चोरट्यांनी बळजबरी आपल्या ताब्यात घेत तेथून पलायन केले.  या घटनेप्रकरणी कोपरगाव पोलिस स्टेशनला उंकार मेवाड यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा गु.र.न. 341/21 भा.द.वि. 394, 397, 34 नुसार दाखल करण्यात आला होता.

अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके व त्यांचे सहकारी करत होते.  समीर कुरेशी (रा. सुभाषनगर, धारणगाव रोड कोपरगाव) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सदर गुन्हा केला असल्याची गुप्त माहिती पो.नि. अनिल कटके यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे स.पो.नि. सोमनाथ दिवटे, सहायक फौजदार मोहन गाजरे, पो.हे.कॉ. मनोहर गोसावी, बाळासाहेब मूळीक, पोलिस नाईक विशाल दळवी, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पो.कॉ. सागर ससाणे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, रणजित जाधव, राहूल सोळंके, चालक पो.हे.कॉ.बबन बेरड यांचे एक पथक तयार करण्यात आले.

या पथकाने कोपरगांव येथे जावून संकलीत केलेल्या माहितीच्या आधारे समीर उमर कुरेशी यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करत पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याने अधिक माहिती देत आपल्या इतर साथीदारांची नावे कथन केली. सोहेल जावेद पठाण (18) रा. सुभाषनगर, धारणगाव रोड, कोपरगाव व  सौरभ रामदास सातोटे (18) रा. सुभाषनगर, धारणगाव रोड, कोपरगाव, हल्ली मुक्काम समतानगर, नाशिक रोड, नाशिक) यांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेत अटक करण्यात आली.

अटकेतील तिघा आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली बजाज कावासाकी मोटार सायकल व दोन मोबाईल असा एकुण 41 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटकेतील आरोपी सोहेल जावेद पठाण याच्यावर यापुर्वी कोपरगांव शहर पोलीस स्टेशनला गु.र.न. 860/20 भा.द.वि. 397, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल आहे. अटकेतील तिघांना पुढील कारवाईकामी कोपरगाव पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here